Garbage Project Issue : कचरा प्रकल्पात महापालिकेची फसवणूक; उरुळी देवाची फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचा आरोप
esakal June 23, 2026 02:45 AM

पुणे - देवाची उरुळी येथील कचरा डेपोत प्रकल्पांमध्ये नाकारलेल्या कचऱ्याची शास्त्रशुद्धपद्धतीने (सायंटिफिक लँडफिलिंग) विल्हेवाट लावणे आवश्‍यक असताना तेथे नियमबाह्य पद्धतीने काम करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यातील ठेकेदारावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी उरुळी देवाची फुरसुंगी नगरपरिषदेतील नगरसेवकांनी व ग्रामस्थांनी केली.

पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषेदत नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन हरपळे, अमोल कापरे, संतोष हरपळे, अजिंक्य ढमाळ आणि अमित हरपळे यांनी भूमिका मांडली.

शहरात महापालिकेचे विविध कचरा प्रकल्प आहेत. त्यामध्ये प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या कचऱ्याचे सायंटिफिक लॅन्डफिलिंग होते. हे काम आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीकडून करून घेतले जात आहे. सायंटिफिक लँडफिलिंगसाठी केवळ प्रक्रिया केलेला 'रिजेक्ट' कचरा वापरणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मिश्र कचरा टाकला जात असल्याचे पोलिसांच्या उपस्थितीत नोंदविण्यात आल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला.

आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीचे आंबेगाव, हांडेवाडी आणि रामटेकडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधील कचराच लँडफिलिंगसाठी वापरून प्रक्रिया आणि लँडफिलिंग अशा दोन्ही कामांची स्वतंत्र बिले महापालिकेकडून घेतली जात आहेत. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि 'निरी' संस्थेकडून सर्व प्रकल्पांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाई करावी. नियमांच्या उल्लंघनाबाबत न्यायालयातही दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.

आदर्श भारत इन्व्हायरो कंपनीचे संचालक मिलिंद पवार म्हणाले, ‘महापालिकेतर्फे सायंटिफिक लॅन्डफिलींग करण्यासाठी जो कचरा आणून दिला जातो, तोच कचरा आम्ही या ठिकाणी लॅन्डफिलींगसाठी वापरतो. हा कचरा शहरातील सर्व प्रकल्पांमधून येतो. त्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.