पुणे - जगातील सर्वांत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘अनबाउंड ग्रॅव्हेल’ सायकलच्या २० व्या स्पर्धेतील १०० मैल गटात ५६ वर्षांच्या पुणेकर सायकलपटू सूरज कुडतरकर यांनी आपली मोहोर उमटविली. यंदाच्या स्पर्धेत या गटातील शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत.
अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील एम्पोरिया येथे झालेल्या या स्पर्धेत कुडतरकर यांनी १०६.२ मैल (सुमारे १७१ किलोमीटर) अंतर १० तास ३९ मिनिटे ५३ सेकंदांत पूर्ण करत ‘फिनिश लाइन’ गाठली. खडीचे रस्ते, मोठे दगड, चिखल, तीव्र चढ-उतार, पठारे आणि वेगाने वाहणारे वारे, पावसाच्या मुसळधार सरी अशा हवामानातील अनिश्चित आणि अचानक होणाऱ्या बदलांमुळे ही स्पर्धा जगातील मानसिक आणि शरीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या स्पर्धांपैकी एक मानली जाते.
रस्त्यातील चिखलातून सायकल चालविणे शक्य होत नसल्याने स्पर्धकांना सायकल अक्षरशः खांद्यावर घेऊन काही किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अशा खडतर स्पर्धेच्या १०० मैल गटात यंदा एकूण एक हजार ५८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
कुडतरकर यांनी संपूर्ण स्पर्धेत संयमी आणि नियोजनबद्ध कामगिरी केली. त्यांनी एकूण क्रमवारीत एक हजार २०५वे स्थान, पुरुष गटात ९६४ वे स्थान, तर ५० ते ५९ वर्षे वयोगटात ३७० स्पर्धकांपैकी २८७ वे स्थान मिळविल्याची माहिती अनबाउंड ग्रॅव्हेल सायकल स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि नियोजन सर्वांत महत्त्वाचे ठरले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बिल्ड एक्सरसाइज क्लिनिकच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची व्यवस्थित तयारी केली. एंड्युरन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ कंडिशनिंग, कोअर स्टॅबिलिटी, पोषण नियोजन आणि रिकव्हरी यांवर विशेष भर देण्यात आला. विशेष म्हणजे, ५० वर्षांवरील खेळाडू म्हणून त्यांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून प्रशिक्षणाची आखणी केली होती.
- सूरज कुडतरकर, सायकलपटू