UAE-India : इराणचा मुकाबला करण्यासाठी UAE भारताकडून विकत घेणार ही दोन खास शस्त्र
Tv9 Marathi June 23, 2026 02:45 AM

भारत संयुक्त अरब अमीरातला दोन खास शस्त्रांची निर्यात करु शकतो. त्या संदर्भात भारत आणि UAE मध्ये प्राथमिक स्तरावरची चर्चा सुरु आहे. आखाती युद्धात इराणने यूएईवर बरेच हल्ले केले. त्यामुळे सयुक्त अरब अमीरात भारताकडून दोन खास शस्त्र विकत घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अलीकडच्या काळात भारत आणि यूएईमधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. यूएई भारताकडून जी दोन शस्त्र विकत घेणार आहे, त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तान विरुद्ध आपली कमाल दाखवली आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आणि स्वदेशी आकाशतीर एअर डिफेन्स सिस्टिम भारताकडून विकत घेण्याचा यूएई विचार करत आहे. क्षेत्रीय सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने दोन्ही देश पुढे जात आहेत. हा करार प्रत्यक्षात आल्यास भारताच्या संरक्षण निर्यातीला अजून बळ मिळेल. आखाती देशांसोबत भारताने आपण रणनितीक संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे. अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने यूएईमध्ये मिसाइल आणि ड्रोनने अनेक हल्ले केले.

ब्रह्मोस मिसाइल भारत आणि रशियाने मिळून विकसित केलं आहे. जगातील हे वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाइल आहे. 2.8 ते 3 मॅक स्पीड ध्वनीच्या तीनपट जास्त वेगाने हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेपावते. या मिसाइलचं वैशिष्ट्य म्हणजे हे जमीन, समुद्र आणि हवा तिन्ही ठिकाणाहून लॉन्च करता येऊ शकतं. शत्रुची जहाजं, सैन्य तळ आणि महत्वाच्या ठिकाणांना अचूकतेने नष्ट करण्यासाठी ब्रह्मोस सक्षम आहे. याची रेंज 290 ते 450 किलोमीटर आहे. भविष्यात ही रेंज आणखी वाढवण्याची योजना आहे. यूएईसोबत भारताचा करार झाल्यास आखाती देशासोबत ब्रह्मोस निर्यातीचा हा पहिला करार असेल. भारताला यासाठी रशियाची मंजुरी आवश्यक आहे.

विभिन्न शस्त्रास्त्र या सिस्टिमशी जोडलेली आहेत

आकाशतीर भारताची स्वदेशी एअर डिफेन्स कमांड अँड कंट्रोल सिस्टिम आहे. शत्रुची विमानं, मिसाइल आणि ड्रोन्सवर नजर ठेवणं, ट्रॅक करणं आणि त्यांना नष्ट करण्यासाठी ही सिस्टिम बनवली आहे. विभिन्न शस्त्रास्त्र या सिस्टिमशी जोडलेली आहेत. ही सिस्टिम रडार, सेन्सर आणि कम्युनिकेशन नेटवर्कला जोडून रीयल-टाइम माहिती देते. आकाशतीर नेटवर्क सेंट्रीक वॉरफेयरचा भाग आहे. एक सिस्टिम संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा नियंत्रित करते. ड्रोन स्वार्म आणि क्रूज मिसाइलचा हल्ला मोडून काढण्यासाठी ही सिस्टिम खूप प्रभावी आहे. त्यामुळेच यूएईला आकाशतीर मध्ये इंटरेस्ट आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.