ढिंग टांग : गद्दार आणि उद्धार..!
esakal June 24, 2026 10:45 AM

पक्षांतर करणाऱ्यास सर्वसाधारणपणे गद्दार असे म्हटले जाते. गद्दारीची अनेक कारणे असू शकतात. ती सर्वच्या सर्व सयुक्तिक आणि योग्यही असू शकतात, किंवा अर्धी सयुक्तिक आणि अर्धी नियुक्तिक असू शकतात. काहीही असले तरी पक्षांतर करणे हे काही लोकशाहीविरोधी कृत्य आहे, असे आम्हाला वाटत नाही. पक्षांतरबंदीची कुऱ्हाड गद्दारांवर कोसळलीच पाहिजे, असे काही घटनातज्ज्ञांचे मत असते, तर काहींच्या मते ही कुऱ्हाड वगैरे नसून गुलाबपाणी असायला हरकत नाही. तसे आपण सगळेच थोडेफार घटनातज्ज्ञ आहोत. घटना ऊर्फ संविधान हे एक लाल रंगाचे पुस्तक आहे, एवढे ज्ञानही घटनातज्ज्ञ म्हणावयास पुरेसे आहे.

कुणावर गद्दारी किंवा पक्षांतराची वेळ आलीच तर त्यासाठीच्या कारणांची यादी येथे एकत्रित देत आहो. जेणेकरून पक्षांतरेच्छुकांना पुढे सोपे जाईल. नुकतेच अर्धा डझन टायगर फुटले. वास्तविक टायगर हे काही अचानक फुटायला टायर नव्हे!! ‘वेगवान गाडी चालवताना टायर फुटल्यामुळे अपघात होतात’ अशी पाटी आम्ही एका महामार्गावर ओझरती वाचली होती. भरधाव वेगात किती वाचता येणार? परंतु, इथे टायगर फुटले, टायर नव्हे! या सर्व टायगरांना टायरमध्ये घालावे, असे काही लोकांना वाटणे साहजिकच आहे. पण ते एक जाऊ दे. सयुक्तिक कारणे येणेप्रमाणे :

मतदारसंघाच्या विकासासाठी गद्दारी : हे अतिशय विधायक असे काम आहे. खरा लोकप्रतिनिधी वेळ पडल्यास स्वार्थ विसरून आपल्या मतदारांसाठी स्वहिताला तिलांजली देतो. अशा व्यक्तीची गद्दारी ही फंदफितुरी नसून त्याग मानला पायजेलाय. हा लोकशाहीप्रती असलेला निस्सीम विश्वासच आहे. ‘पक्ष गेला उडत, मी तुमचाच, तुमच्यासाठी कायपण,’ असे सांगणारी व्यक्ती सतत निवडून आली पाहिजे की नाही? जय हो!

लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी गद्दारी : हे तर त्यागाचे पुढले पाऊल ठरावे! विरोधी पक्षात राहून आवाज उठवत राहिल्याने फक्त घसा बसतो. निधी अभावी रखडलेली कामे दणादण मार्गी लावण्यासाठी अशी गद्दारी पन्नासवेळा करावी लागली, तरी करावी. जय हो!

पक्षनेतृत्व भेटत नसल्याने गद्दारी : काही वेळा नेतृत्व भेटत नाही, हे खरे आहे. भेटणे सोडा, दिसतही नाही. मोटार चालवत जाताना कधी कधी दिसते. भाषणे करताना दिसते. पण ते तेवढेच. अशावेळी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने कामे मार्गी लावणे हा एकमेव मार्ग उरतो. पण तेही शक्य नसेल तर मात्र गद्दारीशिवाय दुसरा मार्गच उरत नाही. ही एकप्रकारे पक्षांतराची सक्तीच आहे. जय हो!

मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी गद्दारी : हे तर फारच उदात्त असे तत्त्व आहे. किंबहुना हे वैश्विक कर्तव्यच आहे. मोदीजींचे हात बळकट झाले की विश्वाचे हात, पाय, कान, डोळे, नाक, फुफ्फुसे, यकृत, प्लीहा, लहान आंतडे, छोटे आंतडे, हृदय, मज्जारज्जू आदी अवयवही आपापतः बळकट होतात. या अवयवांच्या यादीत मेंदू अनवधानाने राहिला, असे तुम्हाला वाटेल. पण तसे नाही. या कार्यासाठी आवश्यक त्याच अवयवांचा उल्लेख केला आहे. जय हो!

कार्यकर्त्यांसाठी गद्दारी : मेहनत करूनही कार्यकर्ते अपयशी ठरतात, हे बघून अनेक लोकप्रतिनिधींच्या काळजाला घरे पडतात. हे संवेदनशीलपणाचे निदर्शक नव्हे काय? कार्यकर्त्यांसाठी पक्षांतर करणे आवश्यक होऊन बसते. इच्छा असूनही निष्ठा दाखवता येत नाही. काय करणार? मग...जय हो!

गद्दारीसाठी गद्दारी : लोकशाही प्रवाही ठेवण्यासाठी गद्दारी हवीच. अन्यथा ते साचलेले डबके होईल. अतएव प्रत्येक लोकप्रतिनिधीने आयुष्यात एकदा तरी गद्दारी करावीच. जय हो!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.