पार्कसाईट, असल्फा परिसरात रस्त्यांवर पाणी
नाल्यांमधील गाळ, प्लॅस्टिक कचरा रस्त्यावर
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः दिवसभर रिपरिप सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावत घाटकोपर परिसराला अक्षरशः झोडपून काढले. रात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पार्कसाईट, असल्फा आणि साकीनाका परिसरात पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले.
पार्कसाईट येथील संदेश विद्यालयाजवळील नाल्यातील मोठ्या प्रमाणातील गाळ पाण्यासोबत बाहेर आल्याने परिसरातील रस्ते चिखलमय झाले. दरवर्षी पावसाच्या सुरुवातीलाच डोंगरातून वाहून येणाऱ्या नाल्यामुळे या भागात पाणी रस्त्यावर येण्याची समस्या निर्माण होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
जगदुशा नगर येथील मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले, तर रस्त्यांवर चिखलाचा थर पसरल्याने वाहतूक आणि पादचाऱ्यांची गैरसोय झाली. नाले बंदिस्त असतानाही त्यामधून वाहून आलेला प्लॅस्टिक कचरा आणि गाळ रस्त्यांवर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, असल्फा मेट्रो स्थानकापासून साकीनाका जंक्शनपर्यंत काही ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या काही दुचाकी वाहनांनाही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याची घटना घडली. पहिल्याच जोरदार पावसात उघड झालेल्या या परिस्थितीमुळे नाल्यांची साफसफाई, पावसाळापूर्व कामांची गुणवत्ता आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.