आरक्षित मैदानाला 'अतिक्रमणा'चा विळखा
esakal June 24, 2026 10:45 PM

मुलुंड, ता. २४ (बातमीदार) : मुलुंड पूर्वेतील एका आरक्षित मैदानात पुन्हा एकदा अतिक्रमण आणि असामाजिक कृत्यांचा विळखा बसल्याने स्थानिक रहिवाशांनी शनिवारी (ता. २०) नवघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मैदानात काही व्यक्तींकडून गोंधळ तसेच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरणारे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असली तरी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, २०१५ पूर्वी म्हाडा परिसरातील हे मैदान अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि विविध गैरप्रकारांचे केंद्र बनले होते. त्यानंतर नागरिक, सामाजिक संस्था, ह्युमन राईटच्या पुढाकारातून येथे प्रकाशयोजना, प्रवेशद्वार आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

ह्यूमन राईटने आणि मिठागर सामाजिक कार्यकर्ते यांनी म्हाडा तसेच मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना पत्र दिल्यावर आमदारांनी त्वरित ‘म्हाडा’ला कळविले तद्नं‌तर दोन्ही शेड काढण्यात आले. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांनी या परिसरात गस्तदेखील वाढवली आहे.

मैदानात शेडची उभारणी
काही वर्षांनंतर पुन्हा अनधिकृत अतिक्रमण सुरू झाल्याने परिस्थिती बिघडली. मैदानात उभारण्यात आलेल्या शेडचा वापर काही असामाजिक तत्त्वांकडून अन्य अनुचित प्रकारांसाठी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हे शेड हटविण्यात आले असले तरी गैरप्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. या मैदानात संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावा आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.