बोईसर, ता. २४ (वार्ताहर) : दांडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काटकरपाडा उपकेंद्राच्या मंगलमूर्ती कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविकेचे पद रिक्त झाले असून, त्या पदासाठी पात्र व इच्छुक महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत दांडी प्राथमिक आरोग्य केंद्राने बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जाहीरनामा पाठवून भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
दांडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार्यक्षेत्रात आरोग्यसेवा अखंडित ठेवण्यासाठी नवीन आशा स्वयंसेविकेची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सात दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
माता-बाल आरोग्यसेवा, लसीकरण, जनजागृती तसेच गावपातळीवरील विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे स्थानिक पात्र महिलांनी या संधीचा लाभ घेत मुदतीत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.