रस्ते दुरुस्तीनंतर विद्यार्थ्यांसाठीच्या बसफेऱ्या पूर्ववत
भोनंग मार्गावरील सेवा अद्याप बंद
रेवदंडा , ता. २४ (बातमीदार) : रेवदंडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अलिबाग आगाराकडून डिसेंबर २०२५ पासून सुडकोली, महाजने आणि भोनंग या तीन मार्गांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा चालवल्या जात होत्या.
दरम्यान, संबंधित मार्गांवरील रस्ते व नाल्यांच्या कामांमुळे या बसफेऱ्या काही काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. मागील आठवड्यात रामवाडी-पेण येथील विभागीय कार्यालयाच्या पथकाने रस्त्यांची पाहणी केल्यानंतर अलिबाग आगाराने सुडकोली मार्गावरील बसफेरी पूर्ववत सुरू केली आहे. तसेच महाजने मार्गावरील बसफेरी सध्या बेलोशी हायस्कूलपर्यंत सुरू करण्यात आली आहे.
मात्र, भोनंग मार्गावरील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने त्या मार्गावरील बससेवा सुरू करता येणार नसल्याची माहिती स्थानिक वाहतूक नियंत्रक कक्षाने दिली. रस्त्याचे काम पूर्ण होऊन मार्ग सुस्थितीत आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी भोनंग फेरीही पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
दोन बसफेऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतुकीची गैरसोय दूर झाली असून, खासगी वाहनांवरील अतिरिक्त खर्चाचाही भार कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.