मुंबई शंभर टक्के ड्रेनेजसमस्या मुक्त होणार!
esakal June 24, 2026 10:45 PM

मुंबई १०० टक्के ड्रेनेज समस्यामुक्त होणार!
पालिकेकडून १२ दिग्गज सल्लागारांची नियुक्ती; प्रकल्पांना येणार वेग
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : मुंबईचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने संपूर्ण मुंबई १०० टक्के मलनिस्सारण (ड्रेनेज) जाळ्याखाली आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबईच्या भौगोलिक आणि कायदेशीर आव्हानांवर मात करीत हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिकेने देशातील १२ नामांकित आणि तज्ज्ञ सल्लागार कंपन्यांच्या पॅनेलची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थेत मोठी क्रांती घडणार आहे.
​सध्या मुंबईत पालिकेने सुमारे २,०८०.२७ किलोमीटर लांबीचे मलनिस्सारण वाहिनीचे जाळे यशस्वीपणे उभारले आहे. याद्वारे मुंबईच्या ८५.७४ टक्के क्षेत्राला आणि ८१.२८ टक्के लोकसंख्येला सेवा दिली जात आहे. मात्र उर्वरित भागांमध्ये, विशेषतः उपनगरे, म्हाडाच्या वसाहती आणि दुर्गम भागांत ड्रेनेज लाईन पोहोचवणे हे पालिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईची क्लिष्ट भौगोलिक रचना, भूगर्भातील अनिश्चितता आणि तांत्रिक माहितीचा अभाव यांमुळे ही कामे अत्यंत आव्हानात्मक असतात. आता या १२ तज्ज्ञ कंपन्यांच्या सहाय्याने ही आव्हाने लीलया पेलली जाणार आहेत.
​ड्रेनेज लाईन टाकताना अनेकदा सीआरझेड, वन विभाग, जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या जमिनींचा अडथळा येतो. अशा वेळी केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध पर्यावरण विभागांकडून मंजुरी मिळवणे जिकिरीचे असते. हे पॅनेल ही सर्व कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया सुलभ करेल. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील म्हाडा वसाहतींमधील ड्रेनेज जाळ्यांचे आधुनिकीकरण करणे,​ मुंबईतील विविध तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे सौंदर्य वाढवणे, ​गोराई-मनोरी बेटावर नवीन मलनिस्सारण वाहिनीसह अत्याधुनिक मलजल प्रक्रिया केंद्राचे नियोजन करणे अशा कामांचा समावेश असेल.
​ या पॅनेलमध्ये मे. टेक्नो लँड, मे. अर्थिया कन्सल्टिंग, मे. एनजेएस इंजिनिअर्स, मे. व्हापकोस लिमिटेड, मे. डीआरए कन्सल्टंट्स आणि मे. टंडन अर्बन सोल्युशन्स यांसह १२ दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. हे सल्लागार केवळ तांत्रिक डिझाइन किंवा अहवाल तयार करणार नाहीत, तर सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्पांमध्ये कायदेशीर व आर्थिक सहाय्यदेखील करतील. तसेच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ते पालिकेचे तटस्थ अभियंता आणि तांत्रिक लेखा परीक्षक म्हणून चोख भूमिका बजावतील. या तज्ज्ञ सल्लागारांच्या नियुक्तीमुळे मुंबईतील मलनिस्सारण प्रकल्पांमधील प्रशासकीय दिरंगाई दूर होऊन कामांना वेग येणार आहे. यामुळे प्रत्येक मुंबईकराला स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण लाभण्यास मदत होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.