मुंबई : मुंबई लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या (Mumbai Local Train) घटनेनंतर तब्बल १५ तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. उपनगरीय रेल्वे मार्गावर राबविण्यात आलेल्या मोठ्या शोधमोहीमेनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीची ओळख ३० वर्षीय रोशन सुवर्णा (Mumbai Local Train) अशी झाली आहे. बुधवारी दुपारी पनवेल रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या हालचालींचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.(Mumbai Local Train)
रोशन सुवर्णा हा मिरा रोड परिसरातील रहिवासी असून अंधेरी विमानतळाजवळील एका कार्गो हँडलिंग कंपनीत काम करतो. त्याच कंपनीत त्याचे वडील आणि मोठा भाऊही कार्यरत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, रोशन सुवर्णाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. चौकशीदरम्यान सुवर्णाने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी काम संपल्यानंतर त्याने जवळपास संपूर्ण रमची बाटली संपवली होती. सुरुवातीला अंधेरी पूर्व येथून टॅक्सीने घरी जाण्याचा त्याचा विचार होता. मात्र मुसळधार पाऊस आणि टॅक्सी उपलब्ध नसल्याने त्याने अंधेरी रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात मयंक लोहार यांच्यावर हल्ला केल्यानंतर रोशन सुवर्णा बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ ट्रेनमधून उतरला आणि गर्दीत मिसळून पसार झाला. घटनेनंतर आरोपीची ओळख पटविण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. चर्चगेट ते नालासोपारा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवरील आणि परिसरातील जवळपास ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान आरोपीने घातलेल्या टी-शर्टवर त्याच्या कंपनीचा लोगो स्पष्ट दिसून आला. हीच बाब पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरली. पोलिसांनी संबंधित कार्गो कंपनीत जाऊन आरोपीची ओळख निश्चित केली आणि त्याचा पत्ता, कुटुंबीयांची माहिती तसेच मोबाईल क्रमांक मिळवला.
मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी बोरिवलीहून पसार झाल्यानंतरच्या रोशन सुवर्णाच्या हालचालींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान त्याने आपल्या मूळ गावी मंगळुरूला जाण्यासाठी दुपारी ३ वाजताच्या बसचे तिकीट काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो बसमध्ये चढण्यापूर्वीच पोलिसांचे एक पथक पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचले. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास तो तेथे बसलेला आढळला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढे बोरिवली रेल्वे पोलिसांकडे आणण्यात आले. तेथे त्याला हत्येच्या आरोपाखाली अधिकृतपणे अटक करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतल्यानंतर रोशन सुवर्णा वारंवार जखमी प्रवाशाच्या प्रकृतीबाबत विचारणा करत होता. सुरुवातीला पोलिसांनी त्याला पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्याने आपल्या मोबाईलवर इंटरनेटवर शोध घेतला आणि पीडितेचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पाहिल्या. मुंबईला परत आणताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी त्या बातम्या चुकीच्या असल्याचे त्याला सांगितल्याची माहिती आहे. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरच त्याला या हत्याप्रकरणी अटक केल्याची आणि पीडितेचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली.