UPSC Success Story: आईच्या खांद्यावर बसून शाळा ते युपीएससी मुलाखतीचा खडतर प्रवास, मुलगा अखेर झाला ऑफीसर..
Tv9 Marathi June 26, 2026 01:45 AM

Nitish Kumar UPSC Success Story : युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत सफल होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक असा दोन्हींचा कस लागतो. अनेक उमेदवारांना बरेच प्रयत्न करुनही यश मिळत नाही. काही उमेदवारांचा संघर्ष पाहून तर आपल्याला धक्का बसू शकतो. असाच प्रेरणादायी प्रवास युपीएससी CSe परीक्षा 2025 मध्ये 847 वा रँक मिळवणाऱ्या नितीश कुमार यांचा आहे. हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खतौती कलान गावातील रहिवासी असलेल्या नितीश कुमार यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी सीएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आता ते ऑफीसर होणार आहेत. परंतू त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक शारीरिक अपंगत्वावर मात करीत त्यांनी हे यश मिळवले आहे.नितीश कुमार यांना चालता येत नाही. ते व्हीलचेअरवर बसून प्रवास करतात.

उंची तीन फूट, वजन 21 किलो..12 वर्षांपर्यंत शाळेत गेले नाहीत

युपीएससी सीएस परीक्षेत 2025 मध्ये 847 वी रँक मिळवणारे नितीश कुमार यांनी वेदनांवर मात करत हे यश मिळवले आहे. नितीश कुमार यांना लहानपणी गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराचा नीटसा विकास झाला नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात असह्य वेदना होत असायच्या. त्यांची उंची केवळ तीन फूटच वाढली. आणि वजन केवळ 21 किलोचे आहे. त्यांच्या या आजाराने ते हिंडू फिरु शकत नाही. त्यामुळे ते वयाच्या 12 वर्षांपर्यंत शाळेत गेलेच नाहीत.

हिंदीतून MA केले नंतर UPSC साठी रोजचा 10 ते 11 अभ्यास

युपीएससी CSe परीक्षा 2025 मध्ये 847 रँक मिळवणारे नितीश कुमार यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण गावातील सरकारी शाळेतून पूर्ण केले आहे, त्यानंतर त्यांनी कृष्णानगर येथील गव्हर्नमेंट कॉलेजातून पदवीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी पीजी कॉलेज ( नारनौल ) येथून हिंदी विषयात एमएची डिग्री पूर्ण केली. युपीएससी सीएस परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यानी रोज १० ते ११ तास अभ्यास केला.

वडील शेतकरी, आई किंग मेकर

यूपीएससी CSe परीक्षा 2025 मध्ये 847 वी रँक मिळवणारे नितीश कुमार हरियाणाच्या महेंद्रगढ जिल्ह्यातील खटौटी कला गावाचे रहिवासी आहे. त्यांचे वडील साधे शेतकरी आहेत. त्यांची आई गृहिणी आहेत. नितीश यांना चालता येत नसल्याने त्यांची आई नितीश यांना खांद्यावर बसवून शाळेत सोडायची. युपीएससीच्या इंटरव्यूह रुममध्ये देखील त्यांनी त्यांच्या आईनेच खांद्यावरुन नेले. जेथे नितीश कुमार गेले तेथे त्यांची आई सारथी म्हणून त्यांच्या सोबत राहिली. मुलाखतीला देखील आई त्यांच्या सोबत होती.. आता त्यांचा मुलगा ऑफीसर बनला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.