- डॉ. मालविका तांबे
सध्याच्या काळात शौचाला (मल) बांधून न होण्याचे किंवा वारंवार मलप्रवृत्ती होण्याची तक्रार अनेक व्यक्तींमध्ये आढळत आहे. आयुर्वेदामध्ये अशा प्रकारच्या विकाराला ग्रहणी म्हटलं जातं आणि सध्याच्या काळात इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), स्प्रू मॅलअॅबसॉर्प्शन सिंड्रोम अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विभाजन करण्यात येतं. लक्षणं किंवा नावं कुठलीही असली तरी याच्या मुळात असते अपचन. अर्थातच आपल्या शरीरात अग्नी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा हे त्रास दिसू लागतात.
ग्रहणी हा खरंतर आतड्यांचा एक भाग असतो. याची अगदी सोपी व्याख्या म्हणजे जिथे अन्नपचन झाल्यानंतर ग्रहण केलं जातं त्याला ग्रहणी म्हणतात. तथापि अग्नी बिघडला की ग्रहणीत दोष उत्पन्न होतात आणि त्यामुळे कधी कधी जुलाब, कधी अर्धवट पचलेलं अन्न, कधी बद्धकोष्ठता, कधी वारंवार मलप्रवृत्ती होणे असे त्रास व्हायला लागतात. एवढंच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात वजन कमी होणं, थकवा वाटणं, अंगात रक्त कमी होणं, महत्त्वाच्या सूक्ष्म पोषक घटक शरीरामध्ये कमी पडणं, दम लागणं, तोंडात छाले, अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसू लागतात.
ग्रहणीची कारणे
सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या संबंधित नियम अजिबात पाळले जात नाही आणि त्याच्यामुळे अग्नी मंदावतो. आयुर्वेदाच्या मताने
अभोजनात अर्थात फार प्रमाणात लंघन केल्याने अग्नीचे दोष सुरू होतात. सध्याच्या काळात आपण पाहिलं तर वजन कमी ठेवण्याकरता अन्नाच्या बाबतीत अगदी टोकाची भूमिका घेतली जाते. दूध, तूप, साखर, लोणी इत्यादी सारखे शरीरामध्ये मदत करणाऱ्या गोष्टी संपूर्णपणे बंद केल्या जातात. या सगळ्याने वात दोष वाढून अग्नी मंदावते.
अजीर्ण ः भोजनात अर्थात शरीरामध्ये पचन अग्नी कमी असतो किंवा पहिलेच भोजन पचलेले नसते. अशा वेळेला सुद्धा काहीतरी खाणे.
विषमाशन अर्थात जेवणाच्या वेळा किंवा पद्धती दोन्हींमध्येही काही सातत्य नसणे.
असात्म्य जेवण करणे अर्थात गरम-शीत गोष्टी एकत्र घेणे, अति रुक्ष गोष्टी घेणे, दूषित अन्नपदार्थ घेणे
वेगधारण म्हणजे आपल्या नैसर्गिक वेगांना अवरोध करणे हे ग्रहणीशी संबंधित काही प्रमुख कारणांमध्ये आयुर्वेदाने सांगितलेले आहे. यातल्या बहुतांशी गोष्टी आपल्याला सध्याच्या काळात फार सामान्यपणे दिसतात.
आयुर्वेदाच्या मताने वात, पित्त, कफ या तिन्हींच्याही आधारे ग्रहणीचे निदान केले पाहिजे आणि त्या आधारावर केलेली चिकित्सा मदत करू शकते. चिकित्सांतल्या काही सामान्य गोष्टी आपण बघूयात.
१. ताक.
ताक हे दीपन करणारे म्हणजे अग्नी प्रदीप्त करणारे, ग्राही म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे आणि लघु म्हणजे पचण्यास हलके असते. या तिन्ही कारणांमुळे ताक हे ग्रहणी रोगामध्ये उत्तम पथ्य असते. घरी योग्य पद्धतीने लावलेल्या ताजे व गोड दह्यामध्ये पुरेसे पाणी मिसळून त्याला नीट घुसळावे. घुसळल्यानंतर त्याच्यात तयार झालेलं लोणी काढून टाकावे व असे ताजे ताक पित्त वाढवत नाही. रुक्ष असल्याने कफ दोषासाठी हितकर असते व चवीला गोड आंबट असल्यामुळे वातासाठीही अनुकूल असते. ताजे ताक पचायला तर मदत करतेच त्याचबरोबर शरीरात कधीही जळजळ वगैरे होत नाही. खरंतर सर्वच पोटाच्या विकारावर ताक हे उत्तम औषध असते, परंतु ग्रहणीत ते विशेष लाभदायक असते. रोजच जेवणानंतर ताज्या ताकामध्ये काळ मीठ, जिरं पूड, सुंठ पूड घालून पिणे उत्तम ठरते.
तक्रं तु ग्रहणीदोषे दीपनं ग्राहि लघु स्मृतम् ।
वातश्लेष्महरं रुच्यं पाचनं बलवर्धनम् ॥
२. तूप.
अग्नीला प्रदीप्त करण्याकरता तुपासारखं दुसरं द्रव्य नाही. त्यामुळे ग्रहणीच्या रुग्णाने संपूर्ण स्वयंपाक शक्यतो गायीच्या साजूक तुपातच करावा. जेवतानाही भातावर, आमटीमध्ये, पोळीवर साजूक तूप लावलेलं उत्तम राहतं. तसेच अग्निदीपन करणारे द्रव्यांनी संस्कारित केलेलं तूप घेणं उत्तम राहतं. वैद्याच्या सल्ल्याने दशमूलाद्य घृत, पंचमूलाद्य घृत, त्रिफला घृत, चंदनांद्य घृत इत्यादी घेणं उत्तम राहतं. ग्रहणीने ग्रस्त व्यक्तीचा अग्नी खूपच मंदावला असेल आणि त्याला कठीण मलप्रवृत्ती होत असेल तर त्याने जेवणाच्या दरम्यान एक चमचा तुपामध्ये थोडसं मीठ मिसळून सेवन करावे. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ व्हायला मदत मिळू होते.
कठिनाद्यः पुरीषं तु कृच्छ्रान्मुञ्चति मानवः ।
सघृतं लवणैर्युक्तं नरोऽन्नावग्रहं पिबेत् ।।
३. मसाले.
ग्रहणी असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या आहारामध्ये सुंठ, पिंपळी, हिंग, ओवा, संचळ मीठ, डाळिंब, मातुलुंग लिंबू हे नक्की ठेवावे. यामुळे पोटात साचलेला आमसुद्धा कमी व्हायला मदत होते.
ग्रहणीमध्ये काय खावे, काय नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. ग्रहणीमध्ये घरचे केलेले साजूक तूप, लोणी काढलेले ताक, शक्य असल्यास शेळीचे दूध घेणे जास्त उत्तम ठरतात. जुने तांदूळ, साठेसाळीचे तांदूळ, मूग, तूर, मसूर, मध, डाळिंब, कवठ, केळफूळ, जांभूळ उत्तम असतात. भाज्यांमध्ये दुधी भोपळा हा नियमित आहारात ठेवलेला जास्त उत्तम. मसाल्यांमध्ये जिरं आणि धने हे अगदी नियमाने घ्यावे. मधल्या काळात भूक लागलेली असताना साळीच्या लाह्या, राजगिऱ्याच्या लाह्या, मुगाचा लाडू घेतलेलं जास्त उत्तम.
त्यामुळे ताकदही टिकून राहते व अग्नीवर चुकीचा भारसुद्धा पडत नाही. चांगल्या प्रतीचं मध घेणे हे ग्रहणीमध्ये अत्यंत उत्तम ठरतं. आहारामधून गहू, तांदळाचे पोहे, मका आणि जव संपूर्णपणे वर्ज्य कराव्या. भाज्यांमध्ये मेथी, शेवगा, पालक, शेपू वर्ज्य करावे. जड असलेले कडधान्य उदाहरणार्थ उडीद, कुळी, वाटाणे, चणे, सोयाबीन, मटकी, वाल इत्यादी बंद केलेलेच जास्त उत्तम. लाल मिरची, लवंग, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, काजू, पिस्ता, अक्रोड किंवा फार जास्त प्रमाणामध्ये गूळ खाणे वर्ज्य केलेलेच जास्त उत्तम. फळांमध्ये आंबा, फणस, कलिंगड, तरबूज, पपई, नारळ इत्यादी वर्ज्य केलेले जास्त उत्तम राहील.
पचन सुधारण्याच्या दृष्टीने संतुलनची अन्नयोग गोळी घेणे, संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन अविपत्तीकर मदत करू शकेल. अग्नीवर व्यवस्थित कार्य करण्याच्या दृष्टीने पुनर्नवासव, बिल्वसॅन याचाही फायदा मिळू शकतो. शौचाला सतत पातळ होत असल्यास कुटजारिष्ट, कुटज घनवटी हे शौचाला बांधून होण्यास मदत करतात. शरीरातील उष्णता कमी होण्याच्या दृष्टीने संतुलनचे गुलकंद स्पेशल घेणे व नियमित पादाभ्यंग करण्याचा फायदा होऊ शकेल. शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करवून घेणे. त्यानंतर आतड्यांना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या बस्ती घेण्याचा फायदा होताना दिसतो.
ग्रहणी हा मुख्यतः पचनाशी संबंधित आजार असल्यामुळे यात आहार हा औषधासारखा काम करतो. कुठलेतरी रासायनिक औषध घेऊन नुसतं तात्पुरते उपाय करण्यापेक्षा आयुर्वेदिक दृष्टीने उपचार करणं जास्त मदत करू शकेल.