पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाच्या माध्यमातून, पृथ्वीपासून विलग झालेल्या पाण्याची भेट जेव्हा पुन्हा पृथ्वीवरील मातीशी होते तेव्हा त्या मिलनाचा आनंद सुगंधरूपाने प्रत्येक मनुष्याला अतिशय मोहित करतो. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असले तरी मातीच्या सुगंधाला तोड नाही. माती ही पृथ्वीतत्त्वाची निदर्शक किंवा पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे पृथ्वीचा सूक्ष्म गुण गंध आहे.
तसाही ज्यावेळी कुठलाही वास येतो तो वास त्यात असलेल्या पृथ्वीतत्त्वाचा असतो. झाडे, फुले, धातू मातीतूनच तयार झालेले असतात व त्यात असलेले मातीचे अस्तित्व गंधरूपाने प्रकट होते. प्रत्येक वास हा मातीच्या गंधामुळेच असतो. जुईच्या फुलांचा वास मोगऱ्याच्या फुलांच्या वासापेक्षा वेगळा असला तरी त्यात असलेला वास असण्यासाठी तेथे मातीचा वास (अस्तित्व) असावा लागतो. गंध हा पृथ्वीचा महत्त्वाचा गुण.
योगशास्त्रानुसार मेरुदंडाच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी पृथ्वीतत्त्वाचे प्राबल्य असल्यामुळे त्यावर ध्यान करत असताना पृथ्वीतत्त्वाचा सोनेरी रंग व पृथ्वीतत्त्वामुळे त्या ठिकाणी सुगंध येतो. ज्यावेळी शरीरातील पृथ्वीतत्त्व शुद्ध होते त्यावेळी सर्व शरीराला सुगंध येऊ लागतो. हा शरीराचा सुगंध इतरांनाही येऊ शकतो.
मातीसदृश सैंधव मिठासारखा पदार्थ जमिनीतून मिळत असल्याने त्यालाही माती या प्रकारात मोजले जाते, त्याचप्रमाणे माती व सोने यात तसा काहीही फरक नाही असे म्हटले असावे. परंतु मातीचे सोने करण्याची किमया माहीत असावी लागते. मातीचे सोन्यात परिवर्तन करून त्यापासून बनविलेल्या दागिन्यांनी शरीर सजविण्याची क्रिया हा मातीचा फार वरवरचा उपयोग. मातीचा उपयोग करून शरीर सोन्यासारखे चमकवण्याची कला आयुर्वेदाने सिद्ध केली. त्यामुळे आयुर्वेदात मातीला खूप महत्त्व दिलेले आहे.
वेगवेगळ्या ठिकाणची माती वेगवेगळे गुण देते. सध्या ‘मड पॅक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उपचार म्हणजे ‘मातीत पाणी टाकून केलेल्या चिखलाची थेरपी’ असे म्हणायला हरकत नाही. पूर्वापार अनादी काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे अंगावर भस्म धारण करणे. काळ्या समुद्रातील माती अंगावर लावण्याने वेगळा गुण येतो तसेच पांढरी माती, लाल माती यांचे गुण वेगवेगळे मिळू शकतात. माती अंगावर धारण करण्याने शरीराचा एक वेगळाच रंग मिळतो असे नव्हे तर यामुळे शरीर कांतिमान होते, आरोग्य मिळते, शरीरातील आतले रोग दूर करायलाही उपयोग होतो.
प्रत्येकाच्या शरीरात २/३ जलतत्त्व असते व उरलेले १/३ पृथ्वीतत्त्व असते. आपल्या शरीरात असलेली पृथ्वीतत्त्वाची उणीव भरून काढायचे लहान मुलांना लगेच कळते. त्यामुळे बरीच मुले आनंदाने माती खातात. यासाठी भाजलेली पांढरी माती वेगळी मिळते. केवळ लहान मुलेच नव्हे तर बरीच मोठी मंडळीही भाजलेली पांढरी माती खातात. मुले चुकीच्या जागेची, घाणेरडी माती खाणार नाहीत याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते कारण मातीबरोबर त्यात असलेले जंतू शरीराला अपाय करू शकतात.
ज्यावेळी आदिकाळच्या मानवाने मातीतून अचानक हिरवे कोंब वर येताना पाहिले, पाने येताना पाहिली तेव्हा त्याला अत्यंत आश्र्चर्य वाटले नसले तरच नवल. ही हिरवी पाने व झाडाला येणारी लाल, निळी, पिवळी अशी विविधरंगी फुले पाहिल्यानंतर हा चमत्कार कसा झाला याचा विचार करत असता मनुष्याने आकाशाकडे पाहायला सुरुवात केली असता त्याला जगात काहीतरी वेगळी शक्ती आहे हे जाणवले व त्याचबरोबर त्याला मातीतील शक्तीही जाणवली.
मातीत बीज पेरले तर एका दाण्याचे हजार दाणे करून पृथ्वी परत देते हे त्याला कळले. पृथ्वीची क्षमता तसेच तिची क्षमाशीलता अपार आहे, पृथ्वीवर खोदणे, नांगरणे असे काहीही केले तरी त्याचा दंड न करता ती एका दाण्याचे हजार दाणे करून आपल्याला परत देते. म्हणून भूमाता ही मूळ मातृभूमी आहे, असे म्हणण्याची पद्धत पडली.
माणसाच्या मूळ गरजांमधली एक गरज म्हणजे त्याला थंडी-वाऱ्यापासून संरक्षण हवे असते. यासाठी मातीची घरे बांधल्याचा उपयोग होतो हे मनुष्याच्या लक्षात आले. मातीमध्ये एखादी वस्तू पुरून ठेवल्यावर मातीचा त्या वस्तूवर शिजल्यासारखा संस्कार होतो, वस्तूत परिवर्तन होते हेही मनुष्याच्या लक्षात आले. अशा तऱ्हेने मातीचे उपयोग लक्षात घेता घेता ज्यावेळी शास्त्रे लिहून ठेवण्याची वेळ आली तेव्हा आयुर्वेदाने मातीचा उपयोग करून रोग बरे करण्याचे उपाय सांगून ठेवले. आयुर्वेदातील भस्मे ही एक प्रकारची मातीच असते.
त्यामध्ये जळण्यासारखे काही नसते, पण एका दाण्याचे हजार दाणे करण्याचा मातीचा गुण भस्मात शिल्लक असतो. भस्म अंगावर लावण्याची भस्म असतात तशी खाण्याचीही असतात. भस्मांचा उपयोग करून अनेक रोगांवर मात करता येते असे उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत.
प्रत्येकाने रोज मातृभूमीला नमन करावे. सकाळी अंथरुणातून खाली उतरल्यावर आपण मातीला पायाला स्पर्श करणार आहोत या भावनेने समुद्रवसने देवि पर्तस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
असे म्हणून भूमीला नमस्कार करावा, क्षमा मागावी आणि नंतरच तिच्यावर पाय टेकवावे.
‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय, इक दिन ऐसा आएगा मैं रौंदूँगी तोय ।’ असा मातीचा महिमा संत कबीरांनी सांगितलेला आहे. मातीची पूजा करून ‘मी मडके तयार करतो’ अशा भावनेने कुंभार मडके करतो म्हणून मडके तयार होते, परंतु त्याने ‘मी माती तुडवतो आहे’ अशी अहंकारयुक्त भावना ठेवल्यास माती एक दिवशी कुंभाराची माती करायला वेळ लावणार नाही.
माती-पृथ्वी क्षमाशील आहे, मनुष्यमात्रावर, प्राणिमात्रांवर दया करून या विश्वात उभे राहायला जागा देते, अन्न देते व त्यांचे कल्याण करते. आयुर्वेदात रोगपरिहारासाठी मातीचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत म्हणून भूमातेला वंदन करून आपण तिचा उपयोग करून घेतला तर आरोग्य अनुभवता येईल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून ‘संतुलन आयुर्वेद’द्वारा संकलित)