ढिंग टांग : खालचा थर, वरचा थर…!
esakal June 26, 2026 10:45 AM

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : शिवाशिवीची.

राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालत आहेत. मधूनच ओठांची भेदक हालचाल करत आहेत. शब्द ऐकू येत नाहीत. पण ऐकू येत नाहीत, हेच बरे आहे! मधूनच ते अदृश्य तलवारीचे हवेतल्या हवेत हात करत आहेत. समोर शत्रू नाही, हेही बरेच आहे! अब आगे…

उधोजीराजे : (त्वेषाने मान गर्रकन फिरवत) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : (अदबीने येऊन मुजरा करत) घ्या, तिच्यामारी, घातला मुजरा! घ्या!!

उधोजीराजे : (संतापून) ही काय भाषा झाली? जीभ छाटून टाकीन!!

संजयाजी फर्जंद : (जीभ चावत) एक डाव माफी करावी, महाराज! वंगाळ शब्द तोंडातून निघून गेला…

उधोजीराजे : (नाक वाकडे करत) किती ही घाणेरडी भाषा? शी:!! तुम्ही इथं येण्यापूर्वी तुरटीच्या पाण्याने गुळण्या करुन येत चला!!

संजयाजी फर्जंद : (अपराधी सुरात) चुकी झाली! च्यामारी उद्यापासून एक जरी वाईट वंगाळ शब्द तोंडातून गेला, तर महाराज पायताण काढा आणि धा मारुन येक मोजा!!

उधोजीराजे : (किंचित शांत होत) यावेळी माफ करतो, पण पुन्हा असा गुन्हा चालणार नाही! हल्ली राजकारणाचीच भाषा इतकी शिवराळ झाली आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार?

संजयाजी फर्जंद : (निरागस चेहऱ्यानं) मी तो लहान मूल, महाराज! लहान मूल म्हंजे मातीचा गोळा, जसा आकार द्यावा, तसा घेणार!!

उधोजीराजे : (कौतुकानं) तुम्ही इतकं अलंकारिकदेखील बोलू शकता? कमालच झाली! आम्हाला माहीतच नव्हतं…

संजयाजी फर्जंद : (विनम्रपणाने) मी नेहमीच प्रासादिक बोलतो, महाराज! आपली हायर मराठी आहे, आय मीन वरच्या थरातली!!

उधोजीराजे : (हळहळत) त्या कमळेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर अवघ्या राजकारणाचा विचका जाहला! राजकारणाची भाषाच इतकी खालच्या थराला गेली की असं वाटतं, याच्यापुढे आपले टोमणे काहीच नाहीत! छे, काळ मोठा कठीण आला!!

संजयाजी फर्जंद : (चुकचुकत) इतकी खालची भाषा, इतकी खालची भाषा की माझ्या तर अंगावर काटाच येतो, ब्वॉ!!

उधोजीराजे : (भिवई वर चढवत) त्या गद्दाराची भाषा ऐकलीत? असली भाषा आमच्या राजवटीत केली असती तर पाचदा हत्तीच्या पायी देऊन तीन वेळा कडेलोट केल्यानंतर दोन वेळा फाशी दिलं असतं!

संजयाजी फर्जंद : (बुचकळ्यात पडून) हे नेते की गावगुंड तेच कळंना मला, ब्वॉ!!

उधोजीराजे : (संतापातिरेकानं) यांची एवढी हिंमत? त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं त्या विश्वासघातकी, खंजीरखुपश्या, नतद्रष्ट, स्वार्थी, सत्तालोलुप कमळेनं!! तिचंच हे पाप!!

संजयाजी फर्जंद : (विनम्रपणाने) मी संयम पाळतो, महाराज! पण गद्दारांचा विषय निघाला की माझा नाविलाज होतो! हे नतद्रष्ट गद्दार, पन्नास-पन्नास खोकी घेऊन पळाले! आणि वर आम्हाला बंदुकांच्या धमक्या देतायत! बॉम्बच्या धमक्या देतायत! घाण घाण शिव्या देतायत! पण मी तुमचा सच्चा मावळा आहे, असलं काही ऐकून घेणारा नाय! च्यामाय- xxxx…xxxx…xxxx…आणि त्यांच्या xxxx घालून xxxx पुन्हा xxxx!!!

उधोजीराजे : (भूकंपाचा हादरा बसल्यागत) अरे बापरे!! जगदंब, जगदंब!! काय हो ही फटाक्यांची माळ!! छे, ऐकून घाम फुटला आम्हाला!!

संजयाजी फर्जंद : (आणखी चेवात येऊन) बघतोच आता एकेकाच्या xxxx xxx!!

उधोजीराजे : (घाबरुन) पुरे पुरे!

संजयाजी फर्जंद : (विजयी मुद्रेने) हीच तर आमची वरच्या थरातली मराठी भाषा आहे, महाराज!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.