लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करायची लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत सत्ताधाऱ्यांनी आणली; आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी...'
परशराम पाटील, एबीपी माझा June 26, 2026 02:13 PM

Kailas Patil: मंत्रीपदाची शपथ घेताना 'ममत्वभाव न बाळगता काम करेन' असा शब्द वापरला जातो, मग हा ममत्वभाव सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत का बाळगला जात नाही? आमदार-खासदार दुसऱ्या पक्षाचा असला तरी त्या भागातील जनता काही एकाच पक्षाची नसते. विरोधी पक्षाचा माणूस निवडून आला तरी तिथे सत्ताधाऱ्यांना मतदान करणारे लोकही असतात. लोकप्रतिनिधी दुसरा आहे म्हणून जनतेला ब्लॉक करणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक पद्धत सत्ताधाऱ्यांनी आणली असल्याचा थेट हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला.  

शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हीच प्राथमिकता 

कैलास पाटील यांनी सांगितलं की, मी एका अत्यंत सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस आहे. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला जिल्हा परिषद आणि दोन वेळा विधानसभेची एवढी मोठी संधी फक्त आणि फक्त शिवसेनेने व उद्धव ठाकरे साहेबांनी दिली. ज्या पक्षाने आपल्याला शून्यातून एवढी मोठी संधी दिली, त्या पक्षाशी आणि दिवसाची रात्र करून आपल्याला निवडून आणणाऱ्या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हीच माझी पहिली प्राथमिकता आहे. तोच विचार 2022 ला होता आणि आज घाटावर असतानाही तोच विचार कायम आहे. मला पुन्हा कोणी सोडून येण्यासाठी बोलवायला येत नाही, कारण त्यांना 2022 चा कैलास पाटील यांचा अनुभव माहीत आहे. मला जर पक्ष सोडायचा असता किंवा जायचेच असते, तर मी 2022 ला सुरतच्या बॉर्डरवरूनच परत आलो नसतो. 

प्रत्येक माणूस कसा अडचणीत येईल, हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण 

कैलास पाटील म्हणाले, विरोधी पक्षातील लोकांना निधी मिळत नाही, काम करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वीही राज्यात अनेक सरकारं आली आणि त्या काळातही विरोधी पक्ष होते; पण सध्याच्या सरकारची कार्यपद्धती वेगळी आहे. विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंचाला निधीच द्यायचा नाही, असे धोरण सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे.  यात पक्षनेतृत्त्वाची चूक आहे असे म्हणता येणार नाही. सत्ताधारी पक्षानेच सर्व बाजूने अशी परिस्थिती तयार केली आहे की सगळ्यांना ब्लॉक करायचे, कुठेच हालचाल करायला जागा ठेवायची नाही. यंत्रणा आणि विकासनिधीच्या माध्यमातून विरोधी पक्षाचा प्रत्येक माणूस कसा अडचणीत येईल, हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे.

शेवटी मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे 

त्यांनी सांगितले की, ओमराजे निंबाळकर आणि माझी जिगरी मैत्री आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण शेवटी मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे आहे. मला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतरच त्यांच्या या निर्णयाची माहिती चॅनेलच्या माध्यमातून मिळाली, मध्ये नक्की काय झालं, हे मला माहीत नाही. पण त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर उद्धव ठाकरे साहेब जी पुढची दिशा ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही काम करू. उद्धव ठाकरे साहेब जो आदेश देतील आणि ज्या गोष्टी सांगतील, त्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी मी पूर्णपणे तयार असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.