लोणावळा/पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी सिया गोयल हिने आता पोलिसांसमोर नवनव्या कहाण्या रचण्यास (Ketan Agarwal Death case) सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांनी तिच्या दाव्यांमधील (Ketan Agarwal Death case) खोटेपणा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खोडून काढला आहे. लोणावळा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असली, तरी केतन आणि तिच्या मोबाईलमधील चॅट्सने तिच्या या नव्या कल्पित कथेचे बिंग फोडले आहे.(Ketan Agarwal Death case)
चौकशीदरम्यान सिया गोयलने पोलिसांना सांगितले की, तिची केतन अग्रवालशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि तिने हे केतनला स्पष्टपणे सांगितले होते. सियाने पुढे असाही दावा केला की, जेव्हा तिने लग्नाला नकार दिला, तेव्हा केतन तिला म्हणाला होता, "आता खूप उशीर झाला आहे. गोष्टी खूप पुढे निघून गेल्या आहेत आणि आता लग्न मोडणे शक्य नाही." या कथेच्या माध्यमातून सिया स्वतःला निर्दोष दाखवण्याचा आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया या दोघांचेही मोबाईल फोन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी जेव्हा या दोन्ही मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इतर चॅट्सची तपासणी केली, तेव्हा सियाने सांगितलेली कहाणी पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले. चॅट्समध्ये कुठेही लग्नाला नकार किंवा वाद झाल्याचे दिसत नसून, उलटपक्षी दोघांमध्ये एका सामान्य जोडप्याप्रमाणे (Couple) अत्यंत प्रेमळ आणि लग्नाआधीच्या गप्पा झाल्याचे उघड झाले आहे. दोन्ही बाजूंच्या संवादातून ते लग्नासाठी उत्सुक असल्याचेच स्पष्ट होत आहे. याच कारणामुळे पोलीस सियाच्या या नव्या दाव्यावर अजिबात विश्वास ठेवायला तयार नाहीत.
लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत आहे. सियाने केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी ही नवीन कहाणी रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलीस आता या प्रकरणाचा केवळ तिच्या जबाबावर अवलंबून न राहता फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक डेटाच्या आधारे प्रत्येक अँगलने सखोल तपास करत आहेत.
अटक झाल्यापासून आतापर्यंत सिया गोयल हिला पोलीस कोठडीत भेटण्यासाठी तिचे नातेवाईक किंवा कुटुंबातील एकही सदस्य आलेला नाही. सामान्यतः कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भेटण्यासाठी किंवा कायदेशीर मदतीसाठी त्याचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात येत असतात. मात्र, या हाय-प्रोफाईल हत्याकांडात सिया गोयल हिच्याबाबत असे घडलेले नाही. सियाच्या घरात तिचे आई-वडील आणि भाऊ राहतात. परंतु, पोटच्या मुलीने केलेल्या या कृत्यामुळे किंवा समाजात झालेल्या बदनामीमुळे तिच्या कुटुंबातील कोणीही अद्याप तिची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढलेली नाही. त्यामुळे पोलीस कोठडीत सिया सध्या पूर्णपणे एकाकी पडली आहे.
दुसरीकडे, या हत्याकांडातील दुसरा मुख्य आरोपी आणि सियाचा प्रियकर चेतन चौधरी याच्या कुटुंबाची भूमिका यापेक्षा वेगळी पाहायला मिळाली. चेतनच्या घरून त्याचे वडील स्वतः लोणावळा पोलीस ठाण्यात आले होते. या प्रकरणातील तपासाचे काय अपडेट्स आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी पोलिसांची भेट घेतली.
एकीकडे प्रियकर चेतनचे वडील त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत, तर दुसरीकडे या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सिया गोयल हिच्या रक्ताच्या नात्यांनीच तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पोलीस वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून २९ जूनपर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे.