त्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, फटकारे लगावताच गयावया आणि क्षमायाचना; जैन समाजाकडून थेट माफी; शिवतिर्थावर काय घडलं?
Tv9 Marathi June 26, 2026 03:45 PM

काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने राज ठाकरे यांना लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला. यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मान राखत, आपल्या खास शैलीत जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली. मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. या पत्रात जैन समाजाने म्हटले की, 17 जून 2026 रोजी शिवाजी चाैक, प्लाझा सेंटरजवळ दफ्तरी रोड येथे असलेल्या शिवाजी महाराज यांच्या जिरे टोपा पुतळ्यावर काही समाजकंटक व्यक्तींकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला.

या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, याची आम्हाला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून जिरे टोपा हा स्वाभिमान, शाैर्य आणि मराठी अस्मितेचे प्रतिक आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिकाचा योग्य सन्मान राखला पाहिजे, याबाबत आम्ही सहमत आहोत. या प्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष महेश मनोहर फरकसे यांच्या आंदोलनानंतर ध्वज तात्काळ हटवून माफी मागून आमची चूक मान्य केली.

आमच्या समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची, मराठी बांधवांची आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागत आहोत. या घटनेमुळे राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही माफी व्यक्त करतो. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊ, असे त्यांनी म्हटले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.