Vaibhav Sooryavanshi: टीम इंडियाचा बेबी बाॅस वैभव सूर्यवंशी आज (26 जून) सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. भारत-आयर्लंड टी-20 मालिकेत त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. 15 वर्षीय सूर्यवंशीचा भारतीय संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. वैभव आज वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. जर त्याला आज खेळण्याची संधी मिळाली, तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकून भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनेल. हा सामना आज आयर्लंडमध्ये सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यादरम्यान वैभव सूर्यवंशीला स्वतंत्र चेंजिंग रूम मिळेल. त्याचे कुटुंबही त्याच्यासोबत टीम हॉटेलमध्ये राहणार आहे. तथापि, वैभव सामन्यांदरम्यान इतर खेळाडूंसोबत राहू शकेल आणि संघाच्या बैठकांमध्येही सहभागी होईल. आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) बाल संरक्षण धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला, जे आयसीसीने 2019 मध्ये लागू केले होते.
आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दल युरोपमध्ये प्रचंड उत्साह आहे. माजी भारतीय आणि आयरिश क्रिकेटपटू एम. व्ही. नरसिंह राव (बॉबजी) यांनी सांगितले की, बेलफास्टमधील 7 हजार आसन क्षमतेच्या स्टॉर्मोंट मैदानातील तिकिटांना प्रचंड मागणी आहे आणि अनेक युरोपीय देशांतील चाहते या सामन्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
बीसीसीआयतर्फे वैभवला टीम इंडियाची 3 क्रमांकाची जर्सी प्रदान करण्यात आली. भारतीय संघातील थ्रोडाउन विशेषज्ञ रघुच्या हस्ते सूर्यवंशीला ही जर्सी देण्यात आली. वैभव म्हणाला, ज्या दिवशी मी पहिल्यांदा बॅट घेऊन मैदानावर पाऊल ठेवले, त्या दिवशी पाहिलेले माझे स्वप्न साकार झाले आहे. माझ्या कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल आहे आणि ही भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
वैभव हा वयाच्या 15 वर्षे आणि 71 दिवसांत भारतीय संघात निवडला गेलेला सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. त्याने याबाबतीत शेफाली वर्मा आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले आहेत. शेफलीची भारतीय संघात पहिली निवड वयाच्या 15 वर्षे आणि 220 दिवसांत झाली होती, तर सचिनला वयाच्या 16 वर्षे आणि 194 दिवसांत राष्ट्रीय संघात संधी मिळाली होती.
जर वैभवला इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यात किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत एक जरी सामना खेळण्याची संधी मिळाली, तर तो शेफाली आणि सचिन या दोघांनाही मागे टाकून भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनेल. अलीकडेच, भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात, वैभवने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अवघ्या 11 चेंडूंत सर्वात जलद अर्धशतक झळकावले. यापूर्वी, वैभवने आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 776 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 237.31 होता आणि त्याने शतकही झळकावले होते. या कामगिरीमुळे त्याला भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या