Womens T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला टेन्शन, उपांत्य फेरीचं गणित आणखी अवघड
GH News June 26, 2026 08:13 PM

वुमन्स टीम इंडियाने गुरुवारी 25 जूनला बांगलादेशवर 19 बॉलआधी 5 विकेट्स राखून 137 धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा हा या स्पर्धेतील चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवून नेट रनरेट आणखी चांगला करण्याची संधी होती. मात्र वुमन्स टीम इंडियाने ती संधी गमावली. मात्र या विजयानंतरही भारताचं उपांत्य फेरीचं टेन्शन कायम आहे. भारतानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या मोहिमेतील चौथ्या सामन्यात नेदरलँड्सला पराभूत करुन तिसरा विजय मिळवला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकास आणि भारताचे समसमान गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताची धाकधुक वाढली आहे. त्यात आता टीम इंडियासमोर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. त्यामुळे भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा करो या मरो असा झाला आहे.

एका जागेसाठी दोघांमध्ये चुरस

वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहभागी 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक गटातून 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित आहे. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या स्थानासाठी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मात्र टीम इंडिया नेट रनरेट चांगला असल्याने समान गुण असूनही पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना हा रविवारी 28 जून रोजी होणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असले तर कोणत्याही स्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिका साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा आणि दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी 8-8 गुण होतील. अशा परिस्थितीत ए ग्रुपमधून उपांत्य फेरीतील दुसरा संघ हा नेट रनरेटच्या आधारावर ठरवला जाईल.

बांगलादेश उलटफेर करणार?

ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचा नेट रनरेट हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण नेट रनरेटनुसार फिस्कटू शकतं. त्यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगल्या फरकाने जिंकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगलाच कस लागणार आहे. तसेच बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यास भारताला मदत होईल. त्यामुळे आता 28 जून भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी निर्णायक ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.