दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि शासकीय योजनांची योग्य साथ लाभल्यास एक सामान्य ग्रामीण महिला देखील उद्योग क्षेत्रात कशी गरुडझेप घेऊ शकते, याचे एक उत्कृष्ट उदाहरण आग्र्यामध्ये समोर आले आहे. आग्रा जिल्ह्यातील पिनाहट ब्लॉकच्या तासोड गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय राजेंद्री सिंह यांनी २०२० मध्ये सुरू केलेल्या मधमाशी पालन व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज तब्बल २५ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
केवळ १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या राजेंद्री यांचा विवाह वयाच्या २३ व्या वर्षी एका शेतकऱ्याशी झाला होता. त्यांच्या ४ जणांच्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह केवळ शेतीवर आणि पतीच्या मर्यादित उत्पन्नावर अवलंबून होता.
View this post on Instagram
राजेंद्री सिंह यांचा हा प्रवास 'उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण उपजीविका अभियान' अंतर्गत 'बँकिंग करस्पाँडंट (BC) सखी' म्हणून सुरू झाला. त्यांनी गावातल्या इतर १२ महिलांना सोबत घेऊन 'श्री बांके बिहारी स्वयंसहायता बचत गट' स्थापन केला.
त्यांनी सांगितले की, "कोविड-१९ च्या टाळेबंदी दरम्यान आमच्या कौटुंबिक अडचणी खूप वाढल्या होत्या. पतीवर असलेल्या कर्जाचा डोंगर एक मोठे आव्हान बनले होते. अशा परिस्थितीत मी कुटुंबाच्या पाठिंब्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला."
UP: ७० हजार लोकांच्या हाताला काम देणारे सीतापूरचे गालिचे; घराघरातील हातमागावर तयार होऊन पोहोचले अमेरिका-जर्मनीत ३० हजारांच्या मदतीपासून २५ लाखांच्या कर्जापर्यंतचा प्रवासव्यवसाय सुरू करण्यासाठी राजेंद्री यांना सुरुवातीला विविध शासकीय योजनांतून आर्थिक बळ मिळाले:
कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड: येथून ३०,००० रुपयांचे सुरुवातीचे सहाय्य मिळाले.
बँक क्रेडिट आणि मुद्रा कर्ज: ५०,००० रुपयांची बँक क्रेडिट मर्यादा आणि 'मुद्रा कर्ज' योजनेअंतर्गत ८५,००० रुपयांचे कर्ज मिळाले.
लखपती दीदी योजना: केंद्र सरकारच्या 'लखपती दीदी' योजनेच्या लाभार्थी बनल्यानंतर त्यांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ झाली.
व्यवसायाच्या पहिल्याच वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. या यशाने प्रोत्साहित होऊन त्यांनी २०२५ मध्ये ‘जीएस मधमाशी पालन कंपनी’ ची अधिकृत नोंदणी केली आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी २५ लाख रुपयांचे मोठे व्यावसायिक कर्ज मंजूर करून घेतले.
आज राजेंद्री सिंह यांच्याकडे ४०० पेक्षा जास्त मधमाशांच्या पेट्या आहेत. त्यांनी आपल्या उत्पादनाला 'कौशिक हनी' हे नाव देऊन स्वतःचा ब्रँड बाजारात आणला आहे. हा मध आज आग्रा, मथुरा, दिल्ली आणि राजस्थानमधील अलवार व बिकानेर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरवला जातो. हा व्यवसाय बी-टू-बी (व्यापारी ते व्यापारी) आणि बी-टू-सी (व्यापारी ते ग्राहक) या दोन्ही पद्धतींवर यशस्वीपणे चालवला जात आहे.
आता त्यांचा बचत गट केवळ मध गोळा करत नाही, तर त्याचे संपादन, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग देखील स्वतः करतो, ज्यामुळे त्यांच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. या व्यवसायात त्यांच्या हाताखाली ५ स्थानिक लोक काम करत असून, त्यांचे पती आता या कंपनीचे हिशोब (अकाऊंट्स) आणि विपणन (मार्केटिंग) ही धुरा सांभाळत आहेत.
Nanded: देगलूरच्या हॉटेलांमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; पेपरवरच खाद्यपदार्थांची विक्री; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आग्र्यामध्ये ३६,००० हून अधिक महिला बनल्या 'लखपती दीदी'शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्री सिंह यांच्याप्रमाणेच एकट्या आग्रा जिल्ह्यात ३६,००० पेक्षा जास्त महिलांनी 'लखपती दीदी'चा दर्जा प्राप्त केला आहे. शासकीय योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कशा प्रकारे महत्त्वपूर्ण ठरत आहेत, याचे हे उत्तम उदाहरण आहे.