केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! मास्टरमाइंड सियाने पुण्यात नव्हे तर इथे… चेतनसोबतच्या ट्रीमध्ये काय घडलं?
Tv9 Marathi June 27, 2026 10:45 PM

केतन अग्रवाल प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तीन जणांपैकी हत्येची मुख्य मास्टरमाइंड केतनची होणारी पत्नी सिया अग्रवालच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने सर्वच हादरले आहेत. केतनला मारण्यासाठी तीन प्लान तयार होते. त्यातील पहिला प्लान अयशस्वी ठरला. दुसरा प्लान यशस्वी ठरला. तोही यशस्वी झाला नसता तर तिसऱ्या प्लाननुसार महाबळेश्वरमध्ये केतनची हत्या करण्यात येणार होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हत्येचे हे प्लान पुण्यात करण्यात आला नव्हता. तर बाहेरच्या राज्यात हा कट शिजल्याचा पोलिसांचा अंदाज असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्न मोडल्यावर समाजात बदनामी होईल. या भीतीपोटी त्यांनी केतनला रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती आली आहे. सियाचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला. त्यापूर्वीच सिया आणि चेतन हे उदयपूरला फिरायला गेले होते. जानेवारीत दोघेही राजस्थानला गेले होते. त्यांचा एक ग्रुपही सोबत होता. या ठिकाणी ते पाच दिवस थांबले होते. विशेष म्हणजे चेतन चौधरी हा राजस्थानचाच असल्याने हे लोक उदयपूरला गेल्याची माहिती समोर आली आहे.

काय चर्चा झाली?

या ट्रिपच्यावेळी चेतन आणि सियामध्ये काय चर्चा झाली? याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. पोलिसांच्या संशयानुसार, हे दोघे उदयपूरला पिकनिकला गेले होते. तेव्हाच त्यांचा उदयपूरमध्ये केतनला मारण्याचा प्लान ठरला असावा. त्यामुळे पोलीस या ट्रिपशी संबंधित डिजिटल साक्ष्य, ट्रिपचे रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि दोघांमध्ये झालेलं संभाषण यांची छाननी करत आहेत.

केवळ लग्न करायचं नव्हतं?

केतनची हत्या का केली? केवळ लग्न करायचं नव्हतं म्हणून की अन्य काही कारण होतं? याची माहितीही पोलीस घेत आहेत. त्यासाठी पोलीस या दोघांचे मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड आणि संभाषण, तसेच या दोघांची ट्रॅव्हल हिस्ट्रीही पोलीस काढत आहेत. पळून जाऊन लग्न केल्याने कुटुंबाची बदनामी झाली असती असं सियाकडून सांगितलं जात आहे. पण हे कारण पोलिसांना पटत नाहीये. खून केल्याने कुटुंबाची बदनामी झाली नसती का? आणि कोणताही अपराध कितीही लपवला तरी आज ना उद्या तो उघडा होतोच, हे माहीत असूनही सिया आणि चेतनने एवढं मोठं कृत्य कसं केलं? असा सवाल आता सर्व करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.