Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग
esakal June 28, 2026 12:45 AM

मुंबई - सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कुंभे धबधबा या पोस्टबाबत पर्यटन विभागाने भूमिका स्पष्ट केली असून, सदर पोस्टचा उद्देश केवळ संबंधित पर्यटनस्थळाचे नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करणे हा होता, असे विभागाने म्हटले आहे. भविष्यातही पर्यटन विभागाच्या समाज माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या सर्व पोस्ट मध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना लिहिण्यात येतील ; पर्यटकांची सुरक्षेसाठी पर्यटन विभाग कायम कटिबद्ध आहे.

पर्यटन संचालनालयाने स्पष्ट केले की, संबंधित पोस्टमध्ये कोणत्याही विशिष्ट साहसी कृतीला किंवा असुरक्षित भागात जाण्यास प्रोत्साहन देणारा मजकूर अथवा आवाहन करण्यात आलेले नव्हते. पोस्टमध्ये केवळ पर्यटनस्थळाचे निसर्गरम्य वैशिष्ट्य आणि पर्यटन मूल्य अधोरेखित करण्यात आले होते. याशिवाय, पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोस्टमध्ये आवश्यक ती सूचना देखील देण्यात आली होती. तसेच, विभागाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित पोस्ट संग्रहित (Archived) करण्यात आली असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

पर्यटन संचालनालयाने स्पष्ट केले की, राज्यातील पर्यटनस्थळांचा जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने प्रचार-प्रसार करणे हीच विभागाची भूमिका असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे पर्यटन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.