Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव
esakal June 28, 2026 01:45 AM

पुणे - व्यावसायिक केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून नेमक्या कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलल्यास अपघात वाटेल? त्याला विष देऊन ठार मारता येईल का? त्याला मारल्यानंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव कसा करायचा? याची माहिती आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने गुगलवर शोधली होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी या दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सरावही केल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली.

गुन्ह्यानंतर पोलिसांना काय सांगायचे, चौकशीदरम्यान कोणती भूमिका घ्यायची आणि संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. केतनचा १८ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला.

या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनची पहिली भेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळी पार्टीत झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. याच दरम्यान, सियासाठी घरातून लग्न करण्याची मागणी सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिला केतन अग्रवालचे स्थळ आले होते.

कौटुंबिक ओळख असल्याने घरच्यांच्या दबावामुळे सियाने या लग्नाला होकार दिला होता. मात्र चेतनसमवेत प्रेमसंबंधांमुळे सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते. मात्र, सामाजिक प्रतिष्ठेपोटी ती उघडपणे विरोध करू शकत नव्हती. त्यामुळे तिने चेतनसह केतनचा खून करण्याचा कट रचला.

१४ जूनला पहिला प्रयत्न फसला -

सियाने किल्ल्याचे लोकेशन आणि संभाव्य स्पॉट्स चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवले. पुरावा सापडू नये म्हणून दोघेही समाज माध्यमांवरील संभाषण डिलीट करत असत. केतनला दरीत ढकलताना कोणती पद्धत वापरायची, याचा त्यांनी सराव केला.

त्यानंतर १४ जूनला केतनला किल्ल्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, त्या वेळी तो प्रयत्न फसला होता. त्यानंतर १८ जूनला दोघा आरोपींनी पूर्वनियोजित कटाची अंमलबजावणी करायचे ठरविले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.