नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात शनिवारी (ता.२७) सुमारे ६० हजार टोमॅटो क्रेटची हंगामातील उच्चांकी आवक झाली. खुल्या पद्धतीने झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) १०० रुपये ते ३५० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने टोमॅटोच्या बाजारभावात घसरण झाली. बाजारभावात टोमॅटोच्या प्रतिक्रेट मागे शंभर रुपये ते दोनशे रुपयांच्या दरम्यान घट झाली.
मार्च, एप्रिलमध्ये रोपांची लागवड झालेल्या टोमॅटोचा तोडणी हंगाम मागील १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. येथील उपबाजार आवारात जुन्नर, आंबेगावसह संगमनेर, पारनेर, शिरूर या भागातून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
मागील आठवड्यात टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार २०० ते साडेसहाशे रुपयांच्या दरम्यान भाव होता. झालेल्या भांडवलाचा विचार करता सध्याच्या बाजारभावात जेमतेम भांडवली खर्च वसूल होईल, अशी परिस्थिती आहे. टोमॅटो क्रेटला किमान सहाशे ते सातशे रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
कोथिंबीर, मेथीला समाधानकारक भाव
उपबाजारात शनिवारी रात्री कोथिंबीर, मेथी, शेपूच्या २ लाख ९२ हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर जुडीला शेकडा ४०० रुपये ते तीन हजार ३०० रुपयांच्या दरम्यान, मेथीच्या जुडीला शेकडा ९०० रुपये ते तीन हजार २०० रुपयांच्या दरम्यान, शेपूच्या जुडीला ९०० रुपये ते दोन हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
नारायणगाव भाजी बाजारात भाजीपाल्यांच्या सहा हजार १८३ डागांची आवक झाली. या पैकी हिरवी मिरचीच्या ८००, काकडीच्या ७७५, फुलकोबीच्या ९९३ डागाची आवक झाली.
प्रमुख भाजीपाल्याला प्रतवारीनुसार प्रतिकिलोग्रॅम मिळालेला बाजारभाव (रुपयांत) : काकडी : ३-३१, हिरवी व ढोबळी मिरची : ४-५५, फ्लॉवर, कोबी : ३-२०, शेवगा शेंग : ४५-६० रुपये, घेवडा : २०-८५, वांगी : ३ ते २५, भेंडी : ५ ते ५०, पपडी, वालवड : ६०-८०, दुधी भोपळा : ३-२५, चवळी - ४-४०, दोडका : ६-६३, गवार : ६-५५, भुईमूग शेंग : ४९-६७, बटाटा : १३-१५.
पंधरा एकर क्षेत्रात लागवड केलेल्या टोमॅटोची तोडणी सुरू आहे. दररोज १ हजार २०० क्रेट उत्पादन निघत आहे. एकरी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाला आहे. बाजारभाव कमी झाल्याने भांडवली खर्च वसूल होतो किंवा नाही याबाबत चिंता आहे.
- ईश्वर गायकर, टोमॅटो उत्पादक, पाचघर