फिरस्ती – निपाणी देसायांचा वाडा
Marathi June 28, 2026 08:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> प्रांजल वाघ, [email protected]

1796 साली दुसरे बाजीराव मराठेशाहीचे पेशवे झाले. मराठ्यांशी इमानी असणारे आणि दक्षिणेत सांगली-मिरज-जमखंडी येथे सत्ता सांभाळणाऱया सरदार पटवर्धनांशी त्यांचे खटके उडू लागले. सरदार दौलतराव शिंदेंच्या पदरी असलेल्या सिधोजीराजे निंबाळकर यांना त्यांनी दक्षिणेत पटवर्धनांचा बंदोबस्त करायला पाठवले. मोहीम फत्ते केल्यावर शिंद्यांची फौज उत्तरेत इंग्रजांशी लढायला परत गेली, पण सिधोजीराजे आपल्या फौजेसह निप्पाणी येथे स्थायिक झाले आणि आपले स्वतंत्र संस्थान तिथे स्थापन केले. कालौघात त्यांना अप्पा देसाई निपाणीकर म्हणून ओळखले जाऊ लागले.

निपाणी येथे स्थायिक झाल्यावर अप्पा देसाई यांनी आपला भुईकोट वजा वाडा बांधायला घेतला. राहत्या वाड्याच्या भोवती मोठं लढाऊ कोट बांधून घ्यायचे त्यांच्या मनी होते, पण पुढे खर्च अवाजवी वाढल्यावर ते काम त्यांना अर्धवट सोडावे लागले. आजही निप्पाणीच्या त्यांच्या वाड्याभोवती कोटाचे अवशेष उभे आहेत. भलेमोठे प्रवेशद्वार, नगारखाना आणि बाहेरील उंच संरक्षक बुरूज व तट आजही निप्पाणीकरांच्या वैभवाची साक्ष देत उभे आहेत. आतील राहता वाडा आजही अत्यंत सुंदर आहे. एकोणिसाव्या शतकात या वाड्यात सुमारे 5 किमी दूर असलेल्या शिरगुप्पी गावातून भूमिगत कालव्यातून पाणी यायचे. त्याला ‘उडत्या बम्बाचे पाणी’ असं म्हणायचे. त्या दगडी कालव्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

अप्पा देसाई यांचे पुढे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडू लागले. 1811 साली तर त्यांनी चक्क कोल्हापूरला वेढा देऊन कोल्हापूरकरांना जेरीस आणले. शेवटी इंग्रज राजदूत एल्फिन्स्टन याला मध्यस्थी करून तह घडवून आणावा लागला. दुसऱया बाजीराव पेशव्यांनी अप्पा देसाई निप्पाणीकरांना ‘सरलष्कर’ हा खिताब बहाल केला आणि सरदार बापू गोखले यांच्या खालोखाल त्यांची मुत्सद्दी म्हणून गणना होऊ लागली.

पुढे 1818 मध्ये मराठेशाहीच्या अखेरच्या लढाईतसुद्धा ते इंग्रजांविरुद्ध लढले. मराठेशाहीचा पाडाव झाल्यावर इंग्रजांशी चांगले संबंध असल्यामुळे निपाणीचे राज्य त्यांना चालवण्याची परवानगी इंग्रजांनी दिली. 1839 मध्ये त्यांचं दत्तकपुत्र मुरारराव अकाली मृत्यू पावला आणि 1841 मध्ये अप्पा देसाई स्वतः स्वर्गवासी झाले. इथून पुढे मोठा गृहकलह सुरू झाला. अप्पांच्या दुसऱया पत्नीने वाडा ताब्यात घेतला. हे पाहताच अप्पांच्या भावासोबत त्यांच्या इतर पत्नींनी बंड पुकारून 300 अरब हशम किल्ल्यात घुसवून किल्ला ताब्यात घेतला. हे पाहताच इंग्रजांनी निप्पाणीवर आक्रमण करून अरबांना परास्त केले, कोटाचे अधिकांश बांधकाम पडून टाकले आणि निप्पाणी संस्थान खालसा केले. आजही अप्पा देसाई निपाणीकर यांचे वंशज वाड्यात राहतात.

निपाणीला कधी गेलात तर हा भव्य वाडा नक्की पाहून या!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.