धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची हत्या होताच रेल्वे प्रशासाचे दोन मोठे निर्णय, आता थेट प्रत्येक प्रवाशाची…
Tv9 Marathi June 28, 2026 03:45 PM

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची हत्या झाली आहे. धावत्या लोकलमध्ये अवघ्या 22 वर्षीय मयंक लोहार या प्रवाशाची चाकू भोसकून झालेल्या हत्येनंतर, रेल्वे पोलिसांनी (GRP) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आता लोकल प्रवाशांच्या बॅगांची मॅन्युअल तपासणी तीव्र करणार आहेत. उपनगरीय स्थानकांवर गर्दीमुळे बॅगेज स्कॅनर वापरणं कठीण असल्यानं, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या लहान पाठीवरील बॅगा (Backpacks) तपासल्या जातील… अशी माहिती समोर येत आहे.

​किरकोळ वादातून होणाऱ्या हत्यारांचा वापर रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामगारांनी त्यांच्या कामाची हत्यारे/साधने (उदा. चाकू, धारदार वस्तू) ट्रेन प्रवासात सोबत न बाळगता कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी स्वतः बोरीवली रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून प्रवासी संघटनांशी चर्चा केली आहे.

बोरीवली रेल्वे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली

चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येनंतर रेल्वे पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय खोपिलकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. 24 जून रोजी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्ण याने हल्ल्यानंतर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला होता; मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला कुर्ला परिसरातून अटक केली. या प्रकरणानंतर लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून हत्याकांडानंतर रेल्वे पोलीस यंत्रणेत जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

माहिममध्ये 35 वर्षीय व्यक्तीवर हल्ला

माहिम स्टेशनबाहेर धक्काबुक्कीच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना याच्यावर अज्ञात हल्लेखाराने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.