ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?
esakal June 28, 2026 11:45 PM

राज्यातील शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात यवतमाळमधून झाली. त्यानंतर आज त्यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. तसेच भाजपलाही लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी राज्यभर सभा घेत नाही, तर माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी फिरत आहे. कितीही आमदार-खासदार फोडले तरी महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अनेक जण म्हणतात की मी फिरत नाही. पण आता मी सुरुवात केली आहे. त्यामुळे गद्दारांचे नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही."

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीतील एका प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी भावनिक आठवण सांगितली. "विरोधकांकडून पैशांचा पाऊस पडत होता. मात्र, एका गरीब शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या कमाईतून पक्षासाठी मदत दिली. त्या एका रुपयाची किंमत हजारो कोटींपेक्षा मोठी होती. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच नंतर साथ सोडली," असे ते म्हणाले.

तसेच, "प्रचारावेळी माझा मोबाईल क्रमांक घ्या, असे सांगणारे नंतर माझा फोनही उचलत नव्हते. त्यानंतर त्यांच्या भूमिकेची मला जाणीव झाली," असा टोला उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना लगावला. "खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांची नावे आजही गद्दारीसाठी घेतली जातात. त्याचप्रमाणे गद्दारीचा शिक्का सहज पुसला जात नाही," असे म्हणत त्यांनी ओमराजेंवर निशाणा साधला. "आता त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कसा पुसला जाणार?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. "भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे. 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू असून भविष्यात नेतृत्वात मोठे बदल झाले, तरी आश्चर्य वाटू नये. आगामी काळात अनेक राजकीय समीकरणे बदलतील. भाजप आता 'बाबर जनता पक्ष' झाला आहे," असा घणाघात त्यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.