जेऊर : अक्कलकोट शहर व तालुक्यात गुटखा विक्री, अन्नपदार्थांतील भेसळ, काही हॉटेल व खाद्यव्यवसायिकांकडून पुरविले जाणारे अशुद्ध पिण्याचे पाणी व खराब तेल वापरून पुरविले जाणारे अन्नपदार्थ तसेच काही ठराविक डेअरीतील दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींच्या व तातडीने कारवाई व्हावी या नागरिकांच्या इच्छेच्या व चर्चेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यापक आणि धडक कारवाई हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.राज्यात गुटखा बंदी लागू असतानाही काही ठिकाणी गुटख्याची विक्री आणि साठेबाजी सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे पालक व सामाजिक संघटनांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ किरकोळ जप्ती किंवा अधूनमधून होणाऱ्या कारवाईवर न थांबता गुटखा पुरवठा साखळीवरच कठोर प्रहार करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणे चोरीने गुटखा अक्कलकोट तालुक्यात येत असल्याने आणि तरुणांची गुटख्याची व्यसन लक्षात ठेवून व्यापाऱ्यांनी एरवी वीस रुपयाला चार पुढ्या देणारे गुटखा आता चोरून 20 रुपयाला तीन या चढ्या भावाने विक्री करून समाजाला व्यसनाधीनते बरोबरच नफेखोरी करून त्यांना आर्थिक खाईत लोटत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
याशिवाय काही हॉटेल, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे का, तसेच ग्राहकांना दिले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित आणि शुद्ध आहे का, याची नियमित तपासणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. दूध डेअरी, मिठाई उत्पादक, तेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील नमुने तपासून भेसळखोरांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरासह ग्रामीण भागात विशेष तपासणी मोहीम राबवावी, भेसळीचे जाळे मुळासकट उखडून टाकावे आणि गुटखामुक्त समाज निर्मितीसाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात सुद्धा भविकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावार अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी सुद्धा भाविकांतून होत आहे.
अक्कलकोट तालुका हा कर्नाटकाच्या सीमेला लागून असल्याने कर्नाटकात गुटखाबंदी नसल्याने मोठ्या प्रमाणावर गुटखा येथून अवैध मार्गाने तालुक्यात येतो. सध्या सुरू असलेली अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिक तीव्रतेने राबवून गुटखाबंदी आणि अन्नातील भेसळ या दोन्ही प्रभावीपणे राबवण्यासाठी व्यापक मोहीम राबवून अपप्रवृत्ती ही मुळासकट उखडून काढावे आणि गुटखा खाणाऱ्यांना मिळूच नये याची तजवीज करावी अशी रास्त अपेक्षा आहे.
शकील मुजावर