अभिजित बोंगिरवार, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, ग्रोफिन वेल्थ प्रा.लि.
गुंतवणुकीसाठी योग्य फंडाची निवड करण्याविषयी बाजारात नेहमीच बरीच चर्चा होत असते. परंतु, दीर्घकाळातील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, आपण कोणत्या विशिष्ट फंडाची निवड केली यापेक्षा ‘गुंतवणुकीत टिकून राहणे’ तितकेच, आणि कधीकधी तर त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते. मल्टी कॅप फंडाच्या चष्म्यातून पाहिले, तर ही गोष्ट आपल्याला उत्तमरीत्या समजून घेता येते. मल्टी कॅप फंड हे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये प्रत्येकी किमान २५ टक्के गुंतवणूक करतात. त्यामुळे शेअर बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना चांगला लाभ मिळतो. जेव्हा लार्ज कॅप शेअर्स आघाडीवर असतात, तेव्हा फंडाची गुंतवणूक तिथे असतेच. तसेच, जेव्हा मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी येते, तेव्हा त्याचाही फायदा फंडाला मिळतो.
बाजाराच्या संपूर्ण चक्रादरम्यान, जे अनेक वर्षे चालू शकते आणि ज्यामध्ये तेजी-मंदी या दोन्हीचा समावेश असतो. हे व्यापक आणि दीर्घकालीन एक्सपोजर गुंतवणुकीला चक्रवाढ पद्धतीने (Compounding) वाढवण्यास मदत करते. गुंतवणूकदारांसमोरील खरे आव्हान बहुतेक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मोठे आव्हान हे असते, की चक्रवाढ गतीने पैसे वाढण्यासाठी वेळ लागतो आणि बाजाराच्या चढ-उताराच्या काळात फंड धरून ठेवणे मानसिकदृष्ट्या कठीण जाऊ शकते. असे काही कालखंड असतात, ज्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ सपाट किंवा नकारात्मक परतावा देतो; हे कालखंड कधीकधी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात. अशा कठीण काळात, गुंतवणूक काढून घेऊन अधिक चांगल्या परिस्थितीची वाट पाहण्याची गुंतवणूकदारांची प्रवृत्ती असते. परंतु, या दृष्टिकोनात एक मोठी समस्या आहे; ती म्हणजे इक्विटी मार्केटमधील सुधारणा अतिशय तीव्र आणि अचानक होते. या दमदार सुधारणेचे अगदी काही महिने जरी तुमच्या हातातून निसटले, तरी तुमचा अंतिम परतावा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.अशा वेळी मल्टी कॅप फंड कसा मदतीला येतो? मल्टी कॅप फंडाची रचना नेमकी अशाच वेळेस गुंतवणूकदारांच्या मदतीला येते.
विविधता : यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील विविध प्रकारच्या कंपन्यांचे शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवले जातात.
तेजीचा फायदा : बाजाराच्या कोणत्याही परिस्थितीत, तेजीमध्ये असलेल्या किमान एका विभागाचा (Segment) फायदा फंडाला मिळण्याची शक्यता नेहमीच जास्त असते.
जोखमीचे व्यवस्थापन : एखादा विभाग संघर्ष करत असला, तरी दुसरा विभाग गुंतवणूक टिकवून धरतो किंवा वाढवतो. त्यामुळे पूर्ण पोर्टफोलिओ एकाच वेळी खाली जात नाही. या विविधतेमुळेच बाजाराच्या कठीण काळातही गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक चालू ठेवणे सुलभ होते.कालांतराने, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि अस्थिरतेच्या काळातही बाजारात टिकून राहण्याची वृत्ती, यामुळेच इक्विटी फंडांमध्ये मोठी संपत्ती निर्माण होते.
मल्टी कॅप फंड बाजारातील जोखीम पूर्णपणे दूर करत नाही, तर तो ही जोखीम विविध व्यवसाय आणि क्षेत्रांमध्ये विभागून कमी करतो. बाजारातील अस्थिरतेचा सामना करत दीर्घकाळात उत्तम संपत्ती निर्माण करण्यासाठी मल्टी कॅप फंड हा एक योग्य आणि संतुलित पर्याय ठरू शकतो.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी कॅप फंड
या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी कॅप फंडाचा विचार करू शकतात. या फंडात स्थिरतेसाठी लार्ज कॅपमध्ये, तर चांगल्या वाढीच्या संधींचा लाभ घेण्यासाठी मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंडाने ३० मे २०२६ पर्यंत १९.६७ टक्के (३ वर्षे), १६.५१ टक्के (५ वर्षे) आणि १५.०१ टक्के (स्थापनेपासून - ऑक्टोबर १९९४) वार्षिक चक्रवाढ दराने परतावा दिला आहे.