Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये सर्वात मोठा धक्कादायक खुलासा… थेट युट्यूबवरच…
Tv9 Marathi June 29, 2026 11:45 AM

पुण्यातील रिअल इस्टेटचा व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे पोलीसही चक्रावून जात आहे. कोणताही गुन्हा नसताना केतनची हत्या झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. विशेष म्हणजे त्याला मारणारी त्याची होणारी पत्नीच होती. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. केतनची हत्या करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी नवनवीन प्रकार पाहत होते. कोणत्या पद्धतीने त्याला मारता येईल याचा शोध घेत होते. त्यासाठी या दोघांनी गुगल आणि युट्यूबचा सहारा घेतल्याचं सांगितलं जात आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपींची गुगल सर्च हिस्ट्री शोधल्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारे हत्या करता येऊ शकते? याचे व्हिडिओ पाहिले होते. विशेष म्हणजे युट्यूबवर या दोघांनी सर्वाधिक व्हिडीओ पाहिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सिया आणि चेतनने लोहगड किल्ल्यावर जाऊन हत्येची रिहर्सलही केली होती. त्यासाठी त्यांनी सुनसान पॉइंट निवडला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फुल प्लान बनवला

या दोन्ही आरोपींनी केतनचा काटा काढण्यासाठी अत्यंत शातिर योजना बनवली होती. विशेष म्हणजे पकडल्यानंतर किंवा संशय आल्यानंतर काय उत्तरं द्यायची आणि काय नाही? याचाही आरोपींनी आधीच अभ्यास केला होता. कोणत्याही परिस्थितीत आपल्यावर संशय येणार नाही आणि हा खून पचवता येईल, असं प्लानिंग या दोघांनी केलं होतं. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून लोहगड किल्ल्यावर जाताना वेश बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला होता, असंही तपासातून पुढे आलं आहे. आरोपी चेतनने वेश बदलला. पण त्याची एक चूक झाली. प्रचंड गर्मीत तो अंगात हुडी आणि स्वेटर घालून किल्ल्यावर गेला होता. आणि त्याची हीच चूक पोलिसांनी हेरली. एवढ्या कडक उन्हात, अंगाची लाहीलाही होत असताना स्वेटर घालण्याचं कारण काय? असा संशय पोलिसांना आला आणि तिथेच चेतन पकडला गेला.

कुटुंबाची इज्जत…

सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं. तिचं चेतनवर प्रेम होतं. पण लग्नाला नकार दिला किंवा पळून जाऊन लग्न केल्यास घरच्यांची इज्जत जाईल, या भीतीपोटी सिया आणि चेतनने केतनला संपवण्याचा प्लान केला. केतनला संपवल्यावर आपण लग्न करायला मोकळे होऊ असं या दोघांना वाटत होतं. विशेष म्हणजे सियाच्या आईवडिलांना चेतनबद्दल काहीच माहिती नव्हती. तिच्या अफेयरबाबत काहीच माहिती नव्हती. पण सियाच्या भावाला चेतनबद्दलची माहिती होती. चेतन आणि सियाचा भाऊ चांगले मित्र होते. दोघेही क्रिकेट खेळायचे. त्यामुळे त्यांची मैत्री होती. तिथेच सियाची चेतनसोबत ओळख झाली. पण सिया आणि चेतनच्या अफेयरबद्दल तिच्या भावाला माहीत होते की नाही? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.