भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
जागतिक हिरे आणि दागिन्यांच्या बाजारपेठेत भारत एक प्रमुख केंद्र आहे. या उद्योगात विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी रत्न प्रमाणन (सर्टिफिकेशन) आणि प्रतवारी सेवा अत्यंत महत्त्वाच्या असतात. इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) लि. अर्थात ‘आयजीआयएल’ ही या क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठी आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील हिरे प्रमाणन बाजारपेठेत या कंपनीचा वाटा सुमारे ५० टक्के आहे. हिरे व्यापारात जागतिक केंद्र असलेल्या बेल्जियममधील अँटवर्प येथे ‘आयजीआयएल’ची स्थापना १९७५ मध्ये झाली.
भारतात या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी १९९९ मध्ये ‘इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) प्रा. लि.’ म्हणून मुंबईत या कंपनीची स्थापना करण्यात आली. उद्योगाच्या वाढत्या गरजा आणि भांडवल उभारणीच्या उद्देशाने, जुलै २०२४ मध्ये कंपनीचे सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर झाले आणि तिचे नाव बदलून ‘इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) लि.’ करण्यात आले. डिसेंबर २०२४ मध्ये मूळ कंपनीचे १०० टक्के शेअर भारतीय कंपनी अंतर्गत समाविष्ट करून जागतिक ऑपरेशन्सचे एकत्रीकरण करण्यात आले. सध्या ही कंपनी भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. ब्लॅकस्टोन ग्रुप या कंपनीचे प्रवर्तक आहेत. कंपनीच्या दहा देशांमध्ये एकूण ३१ शाखा आणि प्रयोगशाळा आहेत. मुख्य प्रयोगशाळा मुंबई, सुरत, अँटवर्प, न्यूयॉर्क, दुबई, बँकॉक, हाँगकाँग आणि शांघाय येथे आहेत. प्रयोगशाळांशिवाय कंपनी सहा देशांमध्ये १८ रत्नशास्त्र शाळा चालवते, जिथे हिरे आणि रत्नांच्या प्रतवारीचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण समूहामध्ये १,२०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
व्यावसायिक विभाग
‘आयजीआयएल’ प्रामुख्याने शुल्क आधारित प्रमाणन शुल्कातून उत्पन्न मिळवते. कंपनीच्या महसुलात कृत्रिम हिरे प्रमाणन (लॅब ग्रोन) विभागाचा सर्वांत जास्त म्हणजे ५५ टक्के वाटा आहे. त्यानंतर नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रमाणन (१९ टक्के), नैसर्गिक हिऱ्यांचे प्रमाणन (१६ टक्के), कृत्रिम हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रमाणन (७ टक्के) आणि रत्ने आणि इतर प्रमाणन (३ टक्के) असे महसुलाचे विभाजन आहे. यात मुख्यतः कृत्रिम हिरे प्रमाणन विभागाच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसते. या क्षेत्रात कंपनीचा जागतिक बाजारपेठेत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.
विस्तार योजना : भारत आणि जागतिक स्तरावर कृत्रिम हिऱ्यांच्या दागिन्यांचा वापर वेगाने वाढत आहे. मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांच्या पसंतीमुळे या विभागातील प्रमाणन क्षमता वाढवण्यावर कंपनीचा भर आहे. भारतातील प्रमुख टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये नवी संकलन केंद्रे आणि प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ‘आयजीआयएल’ने नुकतीच २०२६ च्या पहिल्या तिमाहीत रंगीत रत्नांच्या प्रमाणन क्षेत्रातील प्रमुख संस्था अमेरिकन जेमॉलॉजिकल लॅबची १०० टक्के मालकी प्राप्त केली आहे, ज्यामुळे रंगीत रत्नांच्या बाजारात कंपनीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
आर्थिक आकडेवारी: (२६ जून २०२६) या कंपनीचे बाजारमूल्य १५,५४५ कोटी रुपये असून, विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये ३६ टक्के आणि ३० टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. आरओसीई आणि आरओई ५३.६ आणि ४३ असे उत्तम आहेत. कंपनीची रोख आवक उत्तम आहे. कर्ज नगण्य आहे आणि ताळेबंद मजबूत आहे.
मूल्यांकन : कंपनीचा शेअर सध्या २७.२ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे. पीईजी ०.९१ आणि ईव्हीईबीटा गुणोत्तर १८.५ आहेत.
निष्कर्ष : नफावाढीचा विचार करता कंपनीचा शेअर वाजवी मूल्यांकनात उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीचा गुंतवणुकीसाठी जरूर अभ्यास करावा.
(डिस्क्लेमर ः हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)