पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले; 35 हून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
जयदीप मेढे June 29, 2026 11:13 AM

Pakistan Airstrike on Afghanistan: कराची येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या नावाखाली पाकिस्तानने रविवारी आणि सोमवारच्या दरम्यानच्या रात्री सुमारे 12:30 वाजता अफगाणिस्तानच्या तीन प्रांतांवर भीषण हवाई हल्ला (Airstrike) केला. पाकिस्तान सरकारने असा दावा केला आहे की, त्यांनी 'तहरीक-ए-तालिबान' (TTP) आणि 'जमात-उल-अहरार' या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहेत. मात्र, अफगाणिस्तानमधून समोर आलेल्या भीषण चित्रांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पाडला आहे. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या वेळीही निवासी भागांना लक्ष्य केले असून, यामध्ये 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pakistan Airstrike on Afghanistan: निष्पाप बालके आणि वृद्धांचा समावेश

अफगाणिस्तानातून आलेल्या छायाचित्रांमध्ये आणि व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मृतांमध्ये 4 ते 9 वर्षांची लहान मुले आणि अनेक वृद्धांचा समावेश आहे. अनेक निष्पाप लहान मुला-मुलींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असतानाही, जगाची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान सरकारचे मंत्री अत्ताउल्लाह तरार हे दावा करत आहेत की, पाकिस्तान हवाई दलाच्या या कारवाईत 25 दहशतवादी मारले गेले आहेत.

Pakistan Airstrike on Afghanistan: अफगाणिस्तानात नक्की कुठे झाले हल्ले?

भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील गियान परिसर, पक्तिया प्रांतातील चमकानी आणि कुनार प्रांतातील मरवारा परिसर येथील निवासी घरे आणि मशिदींना पाकिस्तानी हवाई दलाने लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर, पहिला हल्ला झाल्यानंतर जेव्हा स्थानिक नागरिक पीडितांच्या मदतीसाठी तिथे धावले, तेव्हा रात्री 12:55 वाजता पाकिस्तानी हवाई दलाने त्या निशस्त्र लोकांवर दुसरा हल्ला केला. यामुळेच जखमींची संख्या 100 च्या पार गेली असून मृतांचा आकडा 35 च्या वर पोहोचला आहे.

Pakistan Airstrike on Afghanistan: प्रत्यक्षदर्शींचा आणि नागरिकांचा थरकाप उडवणारा अनुभव

या हल्ल्यात जखमी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "जेव्हा येथे बॉम्बस्फोट झाला, तेव्हा येथे एकही लष्करी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. पाकिस्तान आम्ही दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे सांगत आहे, पण येथे तसे कोणीही नव्हते. या हल्ल्यात बाधित झालेले सर्वजण सामान्य नागरिक आहेत."

चमकानी येथे राहणाऱ्या एका जखमी व्यक्तीने सांगितले की, तो दुबईत मजुरी करतो आणि दोन महिन्यांपूर्वीच घरी परतला होता. हवाई हल्ल्यात त्याच्या शेजारी राहणाऱ्या बादशाह खान यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. पहिला हल्ला होताच शेजारी राहणारे लोक तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी धावले. मात्र, काही मिनिटांतच पाकिस्तानी सैन्याने बचाव कार्य करणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर दुसरा हवाई हल्ला केला, ज्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाला.

Pakistan vs Afghanistan: 9 महिन्यांत 565 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा आश्रयदाता असलेला पाकिस्तान आपल्या देशातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे खापर नेहमी अफगाणिस्तानवर फोडतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून पाकिस्तानी हवाई दल आपल्या देशातील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानात 'दहशतवादविरोधी मोहीम' राबवत असल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्येक वेळी दहशतवाद्यांऐवजी सामान्य नागरिकच मारले जात आहेत. दहशतवादी तळांऐवजी लोकांची घरे, रुग्णालये आणि शाळांवर हल्ले होत आहेत. गेल्या 9 महिन्यांत पाकिस्तानी हवाई दलाने आतापर्यंत 565 सामान्य अफगाण नागरिकांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.