जून महिना संपत आला तरी देखील राज्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु आता राज्यात पावसाचं दमदार आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. नागपूर वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात येत्या 3 जुलै ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भाप्रमाणेच इतरही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.
काय आहे नवा हवामान अंदाज
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यात येत्या 3 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे, मुंबई, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, नंदूबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या काळात धुव्वाधार पाऊस होणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान डख यांनी केलं आहे. येत्या तीन जुलैपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये हलका ते काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. मात्र तीन जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, अतिमुसळधार पाऊस पडले असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान परतीचा पाऊस महाराष्ट्रात जोरदार कोसळेल असा अंदाज देखील पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
जूनमध्ये पावसाची तूट
गेल्या वर्षी जून महिन्यात या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला होता, मात्र यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे पावसामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. एकट्या विदर्भात जवळपास 50 टक्के तूट झाली आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.