‘पीएम किसान’ की शेतकऱ्यांची थट्टा? भंडाऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला फक्त ‘एक पैसा’!
Marathi June 30, 2026 01:25 AM

भंडारा: शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा भंडारा जिल्ह्यात एक अजब आणि संतापजनक नमुना समोर आला आहे. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयांऐवजी चक्क ‘एक पैसा’ जमा झाला आहे! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत…फक्त एक पैसा’! जमा झाला आहे.  मोबाईलवर आलेल्या या मेसेजनंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून, “ही सरकारची आर्थिक मदत आहे की आमची क्रूर थट्टा?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी खेमराज गिरेपुंजे यांना आलेला अनुभव थक्क करणारा असल्याचं म्हटलं जातंय.

गिऱ्हेपुंजे यांच्या मोबाईलवर नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याचा बँक संदेश (Message) आला. बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील या आशेनं त्यांनी मेसेज उघडला. मात्र, तो पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्यांच्या खात्यात जमा झाले होते फक्त ०.०१ रुपये म्हणजेच अवघा ‘एक पैसा’! यावर आता कृषी विभाग आणि केंद्र सरकार काय स्पष्टीकरण देणार? आणि संबंधित शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पूर्ण हप्ता कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20 जूनला पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याचं वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची रक्कम 20 जूनला जारी केली आहे.. या हप्त्याची रक्कम देशातील  9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पीएम किसानच्या 23 व्या हप्त्यामध्ये  18,880 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील अशी माहिती देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालच्या हुगळी येथून एका कार्यक्रमातून ही रक्कम वितरित करण्यात आली.

ई-केवायसीसाठी एक दिवस बाकी

पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.  पीएम किसानच्या पोर्टलवर ओटीपीआधारित ई केवायसी सुविधा सुरु आहे. याशिवाय जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करुन घेणं आवश्यक आहे. ई केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.पीएम किसान सन्मान निधीच्या  लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरु ठेवण्यासाठी ई – केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. यासाठी आता एका दिवसाची मुदत बाकी आहे.

हेदेखील वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.