Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान
esakal July 04, 2026 10:45 PM

कायगाव : पाणी फाउंडेशन स्पर्धेत गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा गावातील कृषी कन्या शेतकरी महिला बचत गटाने एकजुटीचे दमदार उदाहरण घालून दिले आहे. उमेद अभियानांतर्गत 15 महिलांच्या या गटाने सामूहिक शेती, सेंद्रिय खत निर्मिती आणि जलसंधारण असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीचा खर्च कमी केला आहे.

सामूहिक खरेदीतून बचत

खरीप हंगामातील सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते व औषधांची सामूहिक खरेदी करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक सदस्याला लक्षणीय आर्थिक बचत झाली.

सेंद्रिय शेतीला प्राधान्य

गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत असलेल्या बचत गटातील महिलांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत आणि स्लरी यांसारखी जैविक द्रावणे घरच्या घरी तयार केली. त्यामुळे नैसर्गिक शेतीला चालना मिळाली.

जलसंधारणावर भर

पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी गावात शोषखड्डे तयार करण्यात आले. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर महिलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

रोजची नोंद, शिस्तीचे काम

पाणी फाउंडेशन स्पर्धेचा भाग म्हणून महिला दररोज पावसाच्या नोंदी नियमितपणे ठेवत आहेत.

या उपक्रमांसाठी उमेद अभियानाचे अधिकारी झालटे, रमा सुरडकर, आरती पवार, इशा केंद्रे, सुंब तसेच पाणी फाउंडेशनचे अविनाश काळे, प्रल्हाद हर्सुळ, नितल सोळुंके आणि कृषी विभागाचे दीपक शेळके, मनीषा तागड, वैशाली घुमरे, कांचन शेटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, अशी माहिती बचत गटाच्या सदस्यांनी दिली.

भिवधानोराच्या या महिलांनी दाखवून दिले की, एकजूट आणि नियोजन असेल तर शेती नफ्यातही आणता येते आणि पर्यावरणही वाचवता येते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.