वसईत तुफान पाऊस, नाल्यात एकजण वाहून गेला, पुरात अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुटका
Tv9 Marathi July 04, 2026 10:45 PM

वसई आणि नालासोपारा येथे प्रचंड पाऊस पडत आहे. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, नाल्याच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना यश आलेले नाही. वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा येथे पुराच्या पाण्यात ५० वर्षीय व्यक्ती गेला वाहून गेल्याची घटना घडली आहे.

यावेळी नाल्याला आलेल्या पुरात किशोर नामदेव लोखंडे  दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाहून गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना यश आले नाही. काही क्षणांतच ती व्यक्ती पाण्यात बुडून बेपत्ता झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांचे पथक घटनास्थळी बोटीने दाखल झाले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पतीचा शोध लागेना…

या संदर्भात पुरात वाहून गेलेल्या किशोर लोखंडे यांची पत्नी रमा लोखंडे यांनी सांगितले की पतीला शोधण्याचा प्रयत्न पालिका कर्मचाऱ्यांनी केला. मात्र,त्याचा आतापर्यंत काही शोध लागला नाही. किशोर आणि रमा लोखंडे हे मूळचे रत्नागिरीचे रहिवासी असून येथे ते भाड्याने राहात आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी उपस्थित आहेत. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नोकरीवर गेलेले ४१ शिक्षक अडकले

वसई-विरार शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, वाहने वाहून जाणे तसेच घरांचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. मुसळधार पावसात मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये नोकरीवर गेलेले ४१ शिक्षक अडकल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासन आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सर्व ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व शिक्षक शाळेत गेले असताना परिसरात पाणी साचल्याने आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ बचावकार्य हाती घेतले. या बचाव मोहिमेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवेश दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला.

प्रशासन आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सर्व ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे वसई रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यात आले. त्यानंतर ते आपआपल्या घरी रवाना झाले आहे. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रशासनाने नागरिकांना अतिवृष्टीदरम्यान आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

यवतमाळ मारेगाव नाल्यावरील पुलावरील डांबर पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिंधी गावाजवळील कुंभा रोडवरील नव्याने बांधलेल्या नाल्यावरील पुलावरील डांबर पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने कामाचे पितळ उघडे पडले आहे.पुलावरील खडी उघडी पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.