LPG Cylinder Price News जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बालोतरामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांसदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की इंधन संकटाच्या काळात घरगुती सिलेंडरचे दर दोन हजार रुपयांपर्यंत जाऊ शकले असते. मात्र, सरकारनं प्रयत्न करत तसं होऊ दिलं नाही आणि जनतेला महागाईपासून दिलासा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की, मोठे मोठे देश सध्या इंधन टंचाईचा सामना करत आहेत. मात्र, भारतानं प्रयत्नपूर्वक संकटावर मात केली आहे. भारतानं प्रत्येक स्तरावर योग्य निर्णय घेतले. संकटाचं योग्य वेळीच आकलन केलं. प्रभावी धोरण आणि भारताच्या संसाधनांचा संतुलित वापर केला, ज्यामुळं भारत संकटातून सावरला, असं मोदींनी म्हटलं.
नरेंद्र मोदी म्हणाले की,आपल्या गरजेच्या जवळपास 60 टक्के एलपीजी इतर देशांतून आयात केला जायचा, यापैकी 90 टक्के एलपीजी आखाती देशांमधून आणि होर्मुझमधून येत होता. अचानक युद्ध स्थिती निर्माण झाल्यानं तो तिथून होणारा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. तुम्हाला अंदाज असेल आपल्या देशात किती हाहाकाराची स्थिती निर्माण झाली असती. मात्र, सरकारनं संकट सुरु होताच रिफानयरीजच्या श्रमतेवर लक्ष केंद्रीत केलं आणि औद्योगिक कामांसाठी जो गॅस तयार व्हायचा त्याऐवजी रिफानयरीजना घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस तयार करायला सांगितलं आणि सात दिवसात एलपीजीचं उत्पादन वाढलं.
नरेंद्र मोदी म्हणाले की पहिल्यांदा 35000 मेट्रिक टन एलपीजीचं उत्पादन देशात व्हायचं, संकट काळात ते 54000 मेट्रिक टन पर्यंत वाढलं. ज्या रिफायनरीजनं पहिल्यांदा एलपीजी बनवला नव्हता तिथंही एलपीजी तयार केला. घरगुती गॅसच्या मागणीचा ताण एलपीजीवर येऊ नये यासाठी पीएनजी कनेक्शनच्या वाढीसाठी अभियान राबवण्यात आलं. कमी वेळात भारतानं जवळपास 11 लाख पेक्षा अधिक घरांना पीएनजी कनेक्शन देण्यात आली, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,आम्ही घरगुती ग्राहकांवर जास्त भार पडू दिला नाही. जी स्थिती होती, त्यामध्ये गॅस सिलेंडरचा दर 2000 रुपयांपर्यंत जाऊ शकत होते. मोठे बाजार विश्लेषक हाच अंदाज वर्तवत होते. मात्र, आपल्या इथं घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले जात आहेत. दोन दिवस अगोदर सरकारनं व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. आमचं सरकार संवेदनशीलतेनं काम करत आहे, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत भाष्य केलं आहे. युद्धाच्या कारणामुळं डिझेल आणि पेट्रोलवर मोठं संकट आलं होतं. आपल्या देशात मोठ्या मोठ्या तेल विहिरी नाहीयेत. संकट वाढलं तेव्हा क्रूड ऑईलचे दर 70 डॉलर प्रति बॅरलवरुन 120 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. आयातीचे मार्ग बंद होते. जगभरातील काही देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40 ते 50 टक्के वाढ झाली होती. काही देशांमध्ये डिझेल आणि पेट्रोल कोट्याच्या आधारावर मिळत होतं. एप्रिल ते जून दरम्यान पेट्रोल आणि डिझेलमुळं तेल कंपन्यांना 75000 कोटींचं नुकसान झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारनं पेट्रोलवरील 10 रुपयांनी एक्साईज ड्युटी प्रति लीटर कमी केलं आहे. युद्धाच्या दरम्यान भारतानं 40 हून अधिक देशांतून इंधन मागवण्यास सुरुवात केली. भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला की राष्ट्र हित आणि देशाच्या नागरिकांचं हित सर्वांच्या वर असल्याचं मोदी म्हणाले.