सोमवार म्हटलं की आठवड्याची सुरुवात आणि सकाळची घाईगडबड. पण तरीसुद्धा नेहमीचे पोहे, उपमा किंवा इडली-डोसा खायची प्रत्येकाची इच्छा असेलच असं नाही. बऱ्याच जणांना याव्यतिरिक्त काही तरी वेगळं नाश्त्याला हवं असतं. तेव्हा कमी वेळात तयार होणारा, पचायला हलका आणि चवीलाही अप्रतिम असा तांदळाचा चिला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिला इतका मऊ बनतो की लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर याचा आस्वाद आणखीच छान लागतो. त्यामुळे लगेच रेसिपी लिहून घ्या.
साहित्य१ कप तांदूळ
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
२ कप कोमट पाणी
१ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून तेल
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी पाणी काढून तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
तयार केलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात कोमट पाणी घालून चांगले एकजीव करा.
त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिसळा.
आवडीनुसार बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर, ढोबळी मिरची किंवा इतर भाज्याही घालू शकता.
आता चवीनुसार मीठ घाला. मिश्रण खूप पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा.
तयार मिश्रण तव्यावर घालून हलक्या हाताने गोल आकारात पसरवा.
झाकण ठेवून मध्यम आचेवर एक मिनिट शिजवा. नंतर पलटून दुसरी बाजूही सोनेरी होईपर्यंत भाजा.
गरमागरम तांदळाचा चिला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.