मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
फिनिक्स मिल्स लि. ही कंपनी भारतात मॉलचे संचालन व व्यवस्थापन, व्यावसायिक व निवासी मालमत्तेचे बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. किरकोळ विक्री (रिटेल), कार्यालयीन जागा, हॉटेल आणि मालमत्ता व्यवस्थापन हे तिच्या मुख्य व्यवसायांचे भाग आहेत. या कंपनीच्या शेअरचा तांत्रिक विश्लेषणाचा साप्ताहिक पातळीवरचा आलेख सोबत दिला आहे. आलेखानुसार, मार्च २०२३ मध्ये या शेअरचा भाव ६७० रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर या शेअरच्या भावात जुलै २०२४ पर्यंत मोठ्या प्रमाणात तेजी बघण्यात आली आणि या कालावधीत या शेअरच्या भावाने २१६० रुपयांपर्यंत मजल मारली.
मात्र, त्यानंतर हा शेअर एका पातळीत फिरत राहिला ज्याला ‘ॲक्युमलेशन-डिस्ट्रीब्युशन झोन’ असे म्हणतात. मात्र, गेल्या शुक्रवारी म्हणजे जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर हा शेअर ही पातळी वरच्या बाजूस तोडून बंद झाला. ही भावपातळी तोडताना या शेअरच्या उलाढालीतही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली. त्यामुळे आता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास योग्य वेळ आहे. येत्या दीड वर्षात या शेअरचा भाव ३३७० रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. या व्यवहारासाठी १९६८ रुपयांचा साप्ताहिक बंद पातळीवर स्टॉपलॉस लावावा. यात लाभ-व्यय गुणोत्तर १:२० आहे, जे या शेअरच्या खरेदीसाठी अत्यंत पूरक आहे.
(डिस्क्लेमर ः या कंपनीमध्ये माझे कसलेही आर्थिक हितसंबंध नाहीत. या कंपनीमधून मला गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारचे कॉम्पेन्सेशन मिळालेले नाही. मी या कंपनीत कोणत्याही पदावर नाही वा या कंपनीत माझी कोणत्याही प्रकारची भागीदारी नाही; तसेच कंपनीच्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये माझा कोणताही सहभाग नाही.)