तुकाराम मुंढेंच्या खात्याचा भेसळखोरांना मोठा दणका, नाशिकमध्ये 17 लाखांची दूध पावडर जप्त; ‘मोठे
Marathi July 06, 2026 05:25 PM

तुकाराम मुंढे नाशिक FDA छापा: राज्यभरात दूध भेसळीच्या (Milk Adulteration) वाढत्या तक्रारी येत असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सिन्नरमधील शहा आणि परिसरातील गावांमध्ये राबवलेल्या एका गुप्त मोहिमेत प्रशासनाने संशयित दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश करत मोठा हादरा दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच राज्यभर भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम छेडली आहे. त्यांच्या याच आक्रमक पवित्र्याचा भाग म्हणून नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ‘एफडीए’चे पथक शनिवारी सिन्नरच्या पूर्व भागात दाखल झाले होते.

Tukaram Mundhe Nashik FDA Raid: रात्रीच्या गुप्त मोहिमेत 17 लाखांचा विनापरवाना साठा जप्त

सिन्नर तालुक्यातील रामपूर-पुतळेवाडी येथे शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही धडक कारवाई सुरू होती. या मोहिमेत तब्बल 17 लाख 37 हजार 529 रुपयांचा दूध पावडरचा विनापरवाना साठा (Illegal Stock) जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रशांत रोहिदास काळे (वय 23, रा. रामपूर-पुतळेवाडी) याने कोणताही वैध अन्न परवाना (Food License) अथवा खरेदी-विक्रीची अधिकृत कागदपत्रे नसताना हा मोठा साठा करून ठेवला होता. हा साठा दूध भेसळीसाठीच वापरला जाणार असल्याचा तीव्र संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी प्रशांत काळे याच्याविरुद्ध वावी पोलिसांत (Wavi Police Station) भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक प्रमोद सरोवर पुढील तपास करत आहेत.

Tukaram Mundhe Nashik FDA Raid: दूध उत्पादकांना वॉर्निंग आणि ग्राहकांना जागरूक राहण्याचे आवाहन

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना कडक शब्दांत ताकीद दिली आहे. दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. याच सोबतीने, तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही दूध खरेदी करताना अधिक जागरूक आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tukaram Mundhe Nashik FDA Raid: साखळीतील ‘मोठे मासे’ प्रशासनाच्या रडारवर?

या धडक कारवाईनंतर सिन्नर आणि नाशिक परिसरातील दूध माफियांचे धाबे दणाणले आहेत. ‘एफडीए’च्या पथकाने केवळ या एकाच ठिकाणावर समाधान न मानता, दूध भेसळीशी संबंधित आणखी काही संशयास्पद ठिकाणांची कसून तपासणी केल्याची जोरदार चर्चा आहे. परिसरातील काही खवा उत्पादन केंद्रांवरही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. यावरून दूध भेसळीच्या या संपूर्ण काळ्या साखळीतील काही अत्यंत ‘मोठे मासे’ आता प्रशासनाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.