पती रोज मारायचा, बायकोने असा कट रचला की… क्षणात खेळ खल्लास; नवऱ्याचा भयंकर अंत
Tv9 Marathi July 06, 2026 11:45 PM

भारतात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक महिलांनी आपल्या पतीची नर्दयी हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात पतीच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला कोणालाही संशय नव्हता, तीच पत्नी पतीच्या हत्येची आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरगुती वाद आणि पतीकडून होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून पत्नीने झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बायकोने नवऱ्याला संपवलं

समोर आलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, मलवाँ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारापूर असवार गावात 26 जूनच्या रात्री एका तरुणाचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला. तपासात समोर आले की, या तरुणाची हत्या इतर कोणीतरी नव्हे, तर त्याची पत्नी प्रीती उर्फ विनिता हिनेच केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. पतीच्या मारहाणीला कंटाळून तिने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

पेट्रोल अंगावर टाकून आग लावली

पोलीस अधीक्षक अभिमन्यु मांगलिक यांनी सांगितले की, 26 जून रोजी पोलिसांना माहिती मिळाली होती की, तारापूर असवार गावातील एका खोलीत एका व्यक्तीला आग लागली असून तातडीने मदतीची आवश्यकता आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. आता असे समोर आले की, आरोपी पत्नीने पती झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल शिंपडून आग लावली. त्यानंतर बाहेरून घराला कडी लावून ती बँकेत गेली, जेणेकरून ही घटना अपघात असल्याचा आभास निर्माण होईल.

आरोपी पत्नीला अटक

या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले असून तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक अभिमन्यु मांगलिक यांनी सांगितले की, ‘कौटुंबिक वादातून पत्नीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केली आणि तिला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता.’ मात्र आता तिचा बनाव समोर आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.