वेल्हे : राजगड तालुक्यातील प्रसिद्ध अशा मढेघाट धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर केळद खिंडीमध्ये रस्त्यास मोठी आडवी भेग पडल्याने रस्ता सोमवार (ता.०६) रोजी खचला असून हा रस्ता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. केळद तसेच मढे घाटाकडे वाहनाने जाणे शक्य नसल्याने परिसरातील तेरा गावांचा वाहतुकीसाठी संपर्क तुटला असल्याची माहिती राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली आहे.
राजगड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या मढे घाट परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .मुसळधार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अठरा गाव मावळ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ता खचल्यामुळे परिसरातील केळद, निगडे खुर्द, गोपे, कुंबळे, भोरडी ,पिशवी ,एकलगाव, सिंगापूर ,मोहरी ,कुसारपेठ, करनवडी, गुगुळशी ,पांगरी या गावचा वाहतुकीसाठीचा संपर्क तुटला असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रस्ता बंद झाल्याने अत्यावश्यक सेवा रुग्णवाहिका शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१) वेल्ह्याकडुन मढेघाट कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत मात्र आज ज्या ठिकाणी रस्ता खचला त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी रस्ता खचला होता. परिसरातील नागरिकांनी सांगून सुद्धा ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करत बेजबाबदारपणे काम केल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
रमेश शिंदे, माजी सरपंच ,केळद ग्रुप ग्रामपंचायत.
२) केळद खिंड रस्ता खचला असून पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने रस्त्यात पडलेली भेग मोठी होऊ शकते या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारी म्हणून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून परिसरातील नागरिकांना संपर्क करण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.
निवास ढाणे, तहसीलदार, राजगड.
3) खबरदारीचा उपाय म्हणून वेल्हे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेट लावले असून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी असणार आहे.
किशोर शेवते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजगड तालुका