Nashik Heavy Rain : राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना नाशिक जिल्ह्यासह त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि लगतच्या तालुक्यांमध्ये पावसाची (Nashik Rain Update) संततधार कायम असल्याचे चित्र आहे. तर पुढील काही तासात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम असून रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज (7 जुलै) त्रंबकेश्वर, नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यता आहे. परिणामी रात्रीपासूनच प्रशासन सतर्क झाले आहे. आशातच राज्याचे आपप्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मध्यरात्रीच त्रंबकेश्वरच्या पावसाचा आढावा घेतलाय.
दरम्यान, मेटघर किल्ला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आज नाशिक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर त्रंबकेश्वर आणि साडेतीन शक्ती पिठापैकी एक असणारे सप्तशृंगी मंदिर आज बंद राहणार आहे. यासोबतच नदीकाठच्या गावांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, इगतपुरीसह नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने नांदूर मध्यमेश्वर बांधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1 वाजेपासून 1 हजार 614 वरून 3 हजार 228 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे
Nashik Rain : नाशिक, त्रंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी पेठ तालुक्यात प्रशासन अलर्ट मोडवर, पोलीसदलसह SRPF सज्ज
नाशिक जिल्ह्यासह त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि लगतच्या तालुक्यांना रेड अलर्ट दिल्याने आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन घोटी इगतपुरीची पाहणी करून रात्री 11 वाजता त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्रंबकेश्वर तालुक्यातील मेटघर गावाची रात्री 12 वाजता पहाणी केली. सोसाट्याचा वाऱ्यामुळे रात्री पावसाचा जोर वाढल्याने मंत्री महाजन यांनी 27 कुटूंबातील 100 हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्यात. नाशिक जिल्हा बरोबरच वसई विरारसह पालघर जिल्हाचा आढावा त्यांनी घेतला. याभागात 350 ते 400 मिलीमीटर एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पालघर मधीलच एका धरणाचे पिचिंग थोडे सरकले असल्याने आजूबाजूच्या 1 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Nashik Rain News : सप्तशृंगगड परिसरात आजपासून 9 जुलैपर्यंत प्रवेशबंदी; नांदुरी - सप्तशृंगगड घाट मार्गही राहणार बंद
हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, दरड कोसळण्याचा धोका आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कळवण यांनी ७, ८ आणि ९ जुलै २०२६ या कालावधीत श्री सप्तशृंगगड धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ तसेच पर्यटनस्थळांवरील प्रवेशास बंदीचे आदेश जारी केले आहेत. यासोबतच सप्तशृंगगड ते नांदुरी हा घाटमार्गही तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला असून, नागरिक व भाविकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे..कळवण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कश्मिरा संख्ये यांनी आदेश काढले आहेत.
Trimbakeshwar Jyotirling Mandir: त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन न घेताच परतावे लागल मघरीं, भाविकाला अश्रू अनावर
त्रंबकेश्वर परिसरात ढगफुटी होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्रंबकेश्वर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाय योजना करताना प्रशासनाने आज त्रंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र याबाबत उत्तर प्रदेश मधून आलेल्या भाविकांना माहिती नव्हती, त्यामुळे पहाटे साडेचार वाजेपासून त्रंबकेश्वरच्या दर्शनाची आस मनात घेऊन त्रंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजासमोर विनवणी करत आहेत. दोन मिनिटाकरता तरीही दरवाजा उघडा, त्रंबकेश्वरचे दर्शन घेऊ द्या, अशी विनवणी हे भाविक करत आहेत. तान्ह्या बाळासह भाविक रात्री 12 वाजता त्रंबकेश्वर मध्ये दाखल झालेत. भीमाशंकर, घृष्णेश्वरचे दर्शन घेऊन त्रंबकेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविक आले होते. मात्र दर्शन न घेताच भाविकांना माघारी परतावे लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या