खेडमध्ये दरडीखाली दोघांचा मृत्यू, नवी मुंबईत चालकाला फिट, तर कल्याणमध्ये भिंत कोसळली; राज्यात पावसाचा हाहा:कार
Tv9 Marathi July 07, 2026 04:45 PM

मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह कोकणातही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराने वेढल्याने निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. एकीकडे पावसाचा मारा सुरू असताना रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर कल्याणमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. खेड, कल्याणसहित राज्यातील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. विविध भागात घडलेल्या घटनांची माहिती समोर येत आहे.

खेडमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळून २ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री ऊदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातील दहिवली येथे आज पहाटे कोसळली दरड कोसळण्याची घटना घडली.
या दुर्घटनेतून एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सकाळी ६ वाजल्यापासून आमदार योगेश कदम घटनास्थळी उपस्थित आहेत. मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नवी मुंबईत धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला फीट

नवी मुंबईच्या वाशीमध्ये नवीन टोलनाक्यावर एक मोठी दुर्घटना घडली. बेस्ट बसच्या चालकाला अचानक धावत्या गाडीत फिट आल्याने बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस टोलनाक्यावरील लेन नंबर ६ आणि 7 या दरम्यान बस आदळली. या भीषण अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. तर बसमधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
वाशी टोलनाक्यावर हा प्रसंग घडला आहे. किरण जाधव असे बस चालकाचे नाव आहे.

फीट आल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं. बस थेट टोलनाक्याच्या केबिन आणि लेन विभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात बस चालक किरण जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य करत चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

कल्याणमध्ये आरोग्य केंद्राची भिंत कोसळली

कल्याण पूर्वेतील ड मुख्य प्रभाग कार्यालय परिसरात दुर्गेश इमारतीलगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली आहे. या घटनेमुळे इमारतीच्या पंपरूम आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झालं आहे. आरोग्य केंद्राच्या खालची संरक्षक भिंत कोसळल्याने इमारतीलगतचा काही भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे कार्यालयाचा भाग अक्षरशः हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. जागा कमकुवत असल्याची आणि येथे भिंत उभारल्यास दुर्घटना घडू शकते, अशी सूचना रहिवाशांनी दिली होती. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेनंतर स्थानिक शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.