Smart Ration Cards: राज्य सरकारने अन्नधान्य वितरण प्रणालीत अमुलाग्र बदल करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यातंर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका (Smart Ration Card) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मार्ट रेशन कार्ड देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जुन्या कागदी शिधापत्रिका लवकरच हद्दपार होतील. रेशन कार्ड फाटणे अथवा खराब होण्यासारख्या नेहमीच्या कटकटीतून लाभार्थी आणि प्रशासनाची एकदाची सुटका होईल. तर बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
रेशन कार्डला स्वतंत्र क्यूआर कोड
प्रत्येक रेशन कार्डवर स्वतंत्र क्यूआर कोड असेल. यामुळे लाभार्थ्यांची माहिती तात्काळ पडताळा करता येईल. काळाबाजाराला आळा घालता येईल. क्यूआर कोड स्कॅनिंगमुळे बोगस लाभार्थ्यांचे पितळ तर उघडे पडलेच. पण हे रेशन कार्ड आधार कार्डशीही जोडल्या जाणार असल्याने जे सरकारी अधिकारी, कर्मचारी अथवा बड्या घरातील सदस्य या योजनेचा लाभ घेत आहेत, ते समोर येतील. त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळता येतील. अशा लाभार्थ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा प्रशासनाला करता येईल.
क्यूआर कोड स्कॅन झाल्याने लाभार्थ्यांची माहिती तात्काळ पडताळली जाईल. रेशन वाटपाचे, वितरणाचे काम झटपट होईल. दुकानांवरील रांगा कमी होईल. रेशनिंगच्या प्रक्रियेतील वेळ आणि विलंब टाळता येईल. तर रेशनिंग दुकानांवरील गडबडी थांबण्यास मदत होईल. क्यूआर कोडमध्ये संबंधित रेशनधारकाच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती, त्यांना देण्यात येणारे धान्य आणि इतर तपशील एका क्लिकवर मंत्रालयापासून ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पाहता येईल.
वन नेशन, वन रेशन कार्डमधील महत्त्वाचा टप्पा
देशभरात लवकरच वन नेशन, वन रेशन कार्ड मिशन राबवण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन स्मार्ट रेशन कार्ड टिकाऊ प्लास्टिक अथवा पीव्हीसी मटेरियलपासून तयार करण्यात येणार आहे. ते पाण्यात भिजण्याची, फाटण्याची अथवा खराब होण्याची चिंता नसेल. तर हरवल्यास ते तयार करणेही सोपे असेल. क्यूआर कोड थेट शासकीय डेटाबेसशी जोडल्या जाणार असल्याने धान्याचा काळाबाजार थांबवता येणार आहे.