IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले
esakal July 08, 2026 04:45 AM

England vs India, 3rd T20I Marathi Update News : भारताची फलंदाजी तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अक्षरशः कोलमडली... २०१ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या संघाला सावरणे अवघड झाले आणि एक लाजीरवाणा पराभव भारताला पत्करावा लागला. इंग्लंडने १२५ धावांनी मॅच जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच सलग पाच सामन्यांत एकही विजय मिळवू शकलेला नाही.

इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला. प्रिंस यादव व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन धक्के देऊनही इंग्लंडने ७ बाद २०१ धावांचा टप्पा गाठला. फिल सॉल्ट ( ७०), जॉस बटलर ( ३६) व सॅम कुरन ( नाबाद ४१) यांच्या फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हतबल केले. लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली. पण, वैभवला ( १३) अजून बरंच काही शिकावे लागेल, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अभिषेकही १० धावांवर झेलबाद झाला. ( २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! Video )

जॉश टंग व जोफ्रा आर्चर यांनी पहिल्या पाच षटकांत भारताचा निम्मा संघ ५२ धावांवर तंबूत पाठवला. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच पॉवर प्लेमध्ये पाच विकेट्स गमावल्या. इशान किशन ( १३), श्रेयस अय्यर ( ५) व अक्षर पटेल ( १०) यांच्या विकेटनंतर इंग्लंडने विकेट सत्र सुरूच ठेवले होते. तिलक वर्मा ( ३) यष्टिचीत झाला. जॉस बटलच्या हातून चेंडू निसटण्यापूर्वी यष्टींवर आदळल्याने त्याला बाद दिले गेले.

शिवम दुबे दोन धावांवर टंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ अर्शदीप सिंगही ( ४) तंबूत परतला. भारताने ६८ धावांत ८ विकेट्स गमावल्या. टंगने त्याच्या शेवटच्या षटकात हर्षित राणाला बाद करून ४-०-२८-४ अशी स्पेल संपवली. आदील राशीदने शेवटची विके घेताना भारताचा डाव ७६ धावांवर गुंडाळले आमि इंग्लंडने १२५ धावांनी विजय मिळवला.

भारताचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत ८० धावांनी हरला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.