राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
एबीपी माझा वेब टीम July 08, 2026 10:13 AM

Maharashtra Rain Alert : राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने (Maharashtra Rain) रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसानं (Rain) अक्षरशः तांडव सुरू केले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांना आज देखील अलर्ट' (Alert) जारी केला आहे, तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीनंतर आता 8 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र केवळ कोकण आणि घाटमाथ्यावरील काही ठराविक भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

एकीकडे राज्यात पावसाचा जोर कायम असताना आज देखील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. यात कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. तर एकीकडे मुंबई आणि उपनगरात पावसाने परत रिपरिप सुरु केली असून आज देखील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज असून यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. 

Alandi Flood News: आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; खडकवासला धरण शंभर टक्के भरले 

अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर (Alandi Flood News) आला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहे. त्यामुळं अनेक भागात पुराचं पाणी शिरलं होतं. त्यामुळं  मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे, पुण्यातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले असुन धरणातून बावीस हजार आठशे ऐंशी क्सुसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. भिडे पुल मेट्रोच्या कामांसाठी आधीच वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुककोंडी होऊ शकते. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये मिळून 14 टी एम सी म्हणजे 48 टक्के इतका पाणीसाठा जमा झालाय.

दरम्यान, पुणे शहरातील नदी पात्रात पाणी पातळी वाढते आहे, त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावध करण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे या विविध ठिकाणी भेटी देतायत. राजपूत नगर, पुलाचीवाडी, एकता नगरी, निंबजनगर या भागात महापौरांनी पहाटेपासून पाहणी केली आहे.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु; 24 तासांत धरणात तब्बल 1 हजार 493 क्युसेक वेगाने पाणी दाखल

मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे... गेल्या २४ तासांत धरणात तब्बल १ हजार ४९३ क्युसेक वेगाने पाणी दाखल होतेय. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आता २८ . २४ टक्क्यांवर पोहोचलाय. मात्र, दिलासादायक आवक सुरू असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणी कमीच आहे. कारण याच दिवशी गेल्या वर्षी जायकवाडीत ४९ पूर्णांक ६५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे अजूनही मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Pune Rain : वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; अधिकारी-कर्मचारी थोडक्यात बचावले

वरंधा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली. यापूर्वी कोसळलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक मोठी दरड कोसळली. सुदैवाने घटनास्थळी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी थोडक्यात बचावले. या घटनेनंतर काही काळ काम थांबविण्यात आले असून, सुरक्षिततेच्या उपाययोजनांनंतर पुन्हा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Bhandara Rain : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पाहिल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली होती. मात्र, एल निनो चं संकट असल्यानं पाऊस येणार की नाही, या चिंतेत बळीराजा असताना दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळी आणि रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तुमसर तालुका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. कुठं जोरदार तर, कुठं हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. या पावसानं खोळंबलेली भातपिकांची लागवड आता जोमानं होणारं असल्यानं बळीराजा समाधानी झाला असून शेतशिवारात बळीराजा शेती कामात व्यस्त बघायला मिळणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.