Delivery Boys : पावसाचा फटका डिलिव्हरी बॉईजना! वेळेत पार्सल पोहोचविण्याचे आव्हान
esakal July 08, 2026 08:45 PM

पुणे - शहरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नागरिकांबरोबरच ऑनलाइन खाद्यपदार्थ, किराणा आणि विविध वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे पडणे आणि काही मार्ग बंद असल्याने ऑर्डरची डिलिव्हरी करण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट वेळ जात आहे.

सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी गर्दीच्या काळात परिस्थिती अधिक बिकट होत आहे. अनेक डिलिव्हरी कर्मचारी पावसात रेनकोट घालून सलग काम करत असले तरी वाहनांचा कमी वेग, खराब रस्ते आणि सतत पडणारा पाऊस यामुळे ऑर्डर वेळेत पोहोचविणे कठीण होत आहे. काही ग्राहकांकडून उशिराबद्दल नाराजी व्यक्त होत असली, तरी प्रत्यक्षात बहुतांश विलंब हा वाहतूक कोंडीमुळे होत असल्याचे डिलिव्हरी कर्मचारी सांगतात. डिलिव्हरी कंपन्यांनीही पावसाळ्यात कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे. हेल्मेट, रेनकोट आणि वाहनांची तपासणी करूनच कामावर जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साधारण १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणारी डिलिव्हरी सध्या ४० ते ५० मिनिटे घेत आहे. पावसात वाहन चालविताना सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे घाई करणे शक्य नसते. ऑडरमध्ये फारसा फरक पडलेला नाही. शहरात वारकरी येण्यास सुरुवात झाल्याने काही भागांत डिलिव्हरी बॉय उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथे ऑर्डर पोहोचण्यात उशीर होत आहे. गुरुवारी अनेक भागांत ही समस्या येणार आहे.

- सुरज सोनटक्के, डिलिव्हरी बॉय

पावसात डिलिव्हरीसमोरील प्रमुख अडचणी -

- वाहतूक कोंडीमुळे वाढलेला प्रवासाचा वेळ

- रस्त्यांवर पाणी साचल्याने कमी वेग

- झाडे पडल्याने पर्यायी मार्गांचा वापर

- ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास विलंब

- दुचाकी चालविताना सुरक्षिततेचे आव्हान

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.