महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक घटना घडली. दोन बड्या नेत्यांची भेट झाली. त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी विधान भवनात भेट झाली. वरवर ही भेट एका शिष्टाचारासारखी वाटत असली तरी त्याचा टायमिंग आणि पद्धत पाहिल्यानंतर राजकारणात त्याचे वेगवेगळे अर्थ निघणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार विधान भवनात आले होते. तिथून ते थेट एकनाथ शिंदे यांच्या केबिनच्या दिशेने गेले. पवारांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे होते.
शरद पवारआले, त्यावेळी एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीमध्ये व्यस्त होते. शरद पवार आल्याच समजताच एकनाथ शिंदे यांनी बैठक थांबवून शरद पवार यांचं स्वागत केलं. शिंदे आणि पवारांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचा राजकीय सन्मान ठेवला. त्याकडे मोठे संकेत म्हणून पाहिलं जात आहे. एकनाथ शिंदे पुन्हा बैठकीसाठी निघून गेल्यानंतर शरद पवार काहीवेळ केबिनमध्येच थांबले होते. आपल्या आमदारांसोबत बोलत होते.
शरद पवार एकनाथ शिंदेनाच का भेटले असतील?
अलीकडेच उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे यांची नजर पवार गटाच्या खासदारांकडे लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशावेळी शरद पवारांनी थेट एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात जाऊन आपल्या अंदाजात संदेश दिला. त्याशिवाय ही भेट सत्तारुढ महायुतीचे मुख्य रणनितीकार सीएम देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष संदेश असल्याच मानलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याऐवजी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन पवारांनी हे दाखवून दिलं की, कुठल्याही सत्ता केंद्राशी थेट संवाद साधण्याची त्यांची क्षमता आहे. राजकीय मतभेद असले तरी पवार मनभेद ठेवत नाहीत. सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. चर्चेचे दरवाजे ते कधी बंद करत नाहीत.
विचारपूर्वक चाल
आतापर्यंत पवार आणि शिंदे दोघांनी 15 मिनिटात नेमकी काय चर्चा झाली, त्यावर सार्वजनिक भाष्य केलेलं नाही. पण राजकीय विश्लेषक याकडे पवारांची विचारपूर्वक चाल म्हणून पाहत आहेत. या सगळ्या घटनाक्रमाचा नेमका अर्थ पुढच्या काही दिवसात राजकीय समीकरणांमधून स्पष्ट होईल.