Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये
esakal July 10, 2026 03:45 AM

पुणे - आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि आकुर्डीत मुक्काम करून निघालेल्या जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांच्या आगमनाने आज अवघी पुण्यनगरी विठ्ठलमय झाली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे कळस येथे, तर तुकोबांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी बोपोडी येथे भक्तीसागर उसळला. ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम...’ या अखंड नामघोषांनी, टाळ-मृदंगाच्या गजराने सारा परिसर दुमदुमून गेला. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी भक्तीभावाने फुलांची उधळण करत पालख्यांचे स्वागत केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सकाळी साडेअकरा वाजता पुणे महापालिकेच्या हद्दीत कळस येथे प्रवेश करताच भक्तिभावाचा उत्कट आविष्कार अनुभवायला मिळाला. ‘सेवा वारी’ या संकल्पनेअंतर्गत महापालिकेकडून यंदा पालखी सोहळ्याचे वैविध्यपूर्ण पद्धतीने व आनंदोत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मुळा नदीवरील पुलावरून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या वेशीत म्हणजेच बोपोडीत आला.

तो क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवत रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या पालखी रथाच्या दिशेने हात जोडत आशीर्वाद घेतला. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पादुकांना पुष्पहार अर्पण करून दोन्ही पालख्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पुष्पवृष्टी, औक्षण आणि पालख्यांचे स्वागत संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा... माउली...’च्या नामघोषाने दुमदुमला. दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी पालखीसमोर नतमस्तक होत दर्शन घेतले.

पालखी मार्गावर भगव्या पताका अभिमानाने फडकत होत्या. टाळ, मृदंग, वीणा आणि चिपळ्यांच्या मंजुळ सुरात वारकऱ्यांच्या दिंड्या पुढे सरकत होत्या. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर विठ्ठलनाम असलेले वारकरी भक्तिरंगात तल्लीन झाले होते. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला, फुगड्या खेळणाऱ्या वारकरी भगिनी, टाळ मृदंगाच्या ठेक्यावर पावले खेळणारे युवक आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माउलींच्या दर्शनाचा आनंद ओसंडून वाहत होता. दोन्ही पालख्या रात्री पुण्यात मुक्कामी पोहोचल्या.

क्षणचित्रे

  • वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांची पारंपरिक वेशात उपस्थिती

  • चिमुकल्यांना खांद्यावर घेत पालख्यांचे दर्शन

  • 'रामकृष्ण हरी' आणि ''ज्ञानोबा-तुकाराम''च्या जयघोषाने दुमदुमले शहर

  • पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी येणार्‍या पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.